Bengaluru ISRO Ex Employee Kills Wife : बंगळुरूत एका धक्कादायक घटनेत, इस्रोच्या निवृत्त कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीच्या भविष्याच्या चिंतेतून तिची हत्या केली. 

Bengaluru ISRO Ex Employee Kills Wife : बंगळुरूच्या व्हाईटफिल्डजवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये इस्रोच्या निवृत्त कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीची हत्या केल्याच्या प्रकरणाला आता एक अत्यंत वेदनादायी वळण मिळालं आहे. ज्या आईने जन्म दिला, तिची हत्या झाली असतानाही, अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये राहणाऱ्या त्यांच्या एकुलत्या एक मुलीने वैयक्तिक कारणं देत भारतात येण्यास साफ नकार दिला आहे.

ही भयंकर घटना १८ फेब्रुवारी रोजी अवलाहल्ली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बोम्मनहल्ली येथील 'व्हर्चुओसो अपार्टमेंट्स'मध्ये घडली. इस्रोचे माजी कर्मचारी, ७० वर्षीय नागेश्वर राव यांनी आपली ६३ वर्षीय पत्नी संध्या श्री यांची हत्या केली. हे दाम्पत्य २०२२ पासून इथे राहत होतं. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा संध्या श्री यांचा मृतदेह स्वयंपाकघरात पडला होता आणि नागेश्वर राव सोफ्यावर शांतपणे बसले होते. "हो, मीच तिला मारलं. माझ्या मृत्यूनंतर तिची काळजी कोण घेणार? मी फार तर अजून दोन-तीन वर्षं जगेन. आमचे जवळचे नातेवाईकही कोणी नाहीत," अशी कबुली राव यांनी पोलिसांसमोर दिली.

घटनेच्या दिवशीच पोलिसांनी अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये असलेल्या त्यांच्या मुलीशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. सुरुवातीला तिने भारतात येत असल्याचं सांगितलं. त्यामुळे पोलिसांनी मुलीच्या येण्याची वाट पाहत पोस्टमार्टम आणि इतर कायदेशीर प्रक्रिया थांबवल्या होत्या. पण, नंतर तिने आपला निर्णय बदलला आणि वैयक्तिक कारणांमुळे भारतात येणं शक्य नाही, असं ठामपणे सांगितलं. हे ऐकून पोलिसांनाही धक्का बसला.

एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने याबद्दल माहिती देताना सांगितले की, "ती या दाम्पत्याची एकुलती एक मुलगी आहे. आईचा मृत्यू झालाय आणि वडील तुरुंगात जाणार आहेत. अशावेळी कायदेशीर आणि भावनिकदृष्ट्या तिचं इथे असणं खूप महत्त्वाचं होतं. आम्ही तिची खूप समजूत काढली, पण ती यायला तयार झाली नाही," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

अखेर दुसऱ्याच व्यक्तीने दिला मुखाग्नी

मुलीने हात वर केल्यानंतर, पोलिसांकडे नागेश्वर राव यांचे दूरचे नातेवाईक, जेबी नगरमध्ये राहणारे विजय बाबू यांना संपर्क करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पोलिसांच्या विनंतीला मान देऊन, नागेश्वर राव यांचे मेहुणे विजय बाबू यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या आणि संध्या श्री यांच्यावर पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले.

पत्नीच्या भविष्याच्या चिंतेतून पतीनेच तिचा जीव घेतला, तर दुसरीकडे जन्मदात्या आईच्या अंत्यदर्शनासाठीही न आलेल्या मुलीची वागणूक, आजच्या समाजात ज्येष्ठ नागरिकांचा एकटेपणा आणि कौटुंबिक नात्यांमधील दुरावा किती वाढला आहे, हे दाखवून देणारी आहे.