आपण दिवसभर फोन वापरतो, पण तो चार्ज कसा करायचा हे अनेकांना माहीत नसतं. चार्जिंग करताना होणाऱ्या काही सामान्य चुकांमुळे फोन आणि बॅटरीचं मोठं नुकसान होऊ शकतं. या चुका कोणत्या आणि त्या कशा टाळायच्या, हे या बातमीतून जाणून घेऊया.

आजकाल स्मार्टफोनशिवाय जगण्याचा विचारही करता येत नाही. कॉल करण्यापासून ते इंटरनेट, बँकिंग आणि मनोरंजनापर्यंत, आपलं आयुष्य पूर्णपणे मोबाईलवर अवलंबून आहे. त्यामुळे, मोबाईलची बॅटरी आणि चार्जिंगबद्दलच्या छोट्या चुका सुद्धा मोठ्या समस्या निर्माण करू शकतात. विशेषतः, चार्जिंग झाल्यावर फोन काढताना होणाऱ्या एका सामान्य चुकीकडे आपलं लक्षही जात नाही.

मोबाईल चार्ज करताना ही चूक अजिबात करू नका

अनेकजण फोन चार्जिंगवरून काढताना थेट केबल धरून जोरात ओढतात. पण ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. केबल ओढल्यामुळे तिच्या आत असलेल्या बारीक तारांवर आणि कनेक्टरवर अनावश्यक दाब येतो. सतत असं केल्याने चार्जिंग केबल लवकर खराब होते आणि फोनच्या चार्जिंग पोर्टमध्येही समस्या निर्माण होऊ लागतात.

ही आहे योग्य पद्धत

चार्जिंग केबल काढताना, केबल ओढण्याऐवजी फोनला जोडलेला प्लॅस्टिक किंवा मेटलचा भाग बोटांनी पकडून हळूवारपणे बाहेर काढा. यामुळे केबलवर ताण येत नाही आणि ती जास्त काळ टिकते. जर तुमची केबल खराब झाली असेल किंवा कुठेतरी तुटली असेल, तर ती वापरणे धोक्याचे ठरू शकते. अशा खराब केबल्समुळे चार्जिंग करताना फोन आणि चार्जर दोन्ही प्रमाणापेक्षा जास्त गरम होऊ शकतात. त्यामुळे केबल खराब झाल्यास ती लगेच बदला.

स्विच बोर्डमधून चार्जर काढतानाही काळजी घ्या

फोनमधून केबल काढतानाच नाही, तर स्विच बोर्ड किंवा वॉल सॉकेटमधून चार्जर काढतानाही अनेकजण हीच चूक करतात. तिथेही केबल ओढण्याऐवजी, चार्जरचा ॲडॉप्टर हाताने पकडून सॉकेटमधून बाहेर काढावा.

चार्जिंग केबलची योग्य काळजी घेतल्यास फोनचा चार्जिंग पोर्ट सुरक्षित राहतो. फोन जास्त गरम होणार नाही याची काळजी घेणे आणि खराब चार्जर किंवा केबल न वापरल्यास बॅटरीचे आयुष्यही वाढवता येते.

बॅटरी 0% होऊ देऊ नका

फोनची बॅटरी पूर्णपणे संपेपर्यंत (0%) आणि तो बंद होईपर्यंत वापरू नका. त्याचप्रमाणे, प्रत्येक वेळी 100% चार्ज करण्याचीही गरज नाही. बॅटरीची पातळी 20% ते 80% दरम्यान ठेवल्यास बॅटरीचे आयुष्य लक्षणीयरीत्या वाढते.

रात्रभर चार्जिंगला लावू नका: फोन रात्रभर चार्जिंगला लावल्यास बॅटरीवर सतत ताण येतो आणि ती गरम होते. यामुळे दीर्घकाळात बॅटरीची क्षमता कमी होते.

फोन कव्हर काढून चार्ज करा: चार्जिंग होत असताना फोनमधून उष्णता बाहेर पडते. जाड कव्हरमुळे ही उष्णता बाहेर पडण्यास अडथळा येतो. त्यामुळे चार्जिंग करताना कव्हर काढून ठेवणे चांगले.

बनावट चार्जर वापरू नका

ओरिजिनल/सर्टिफाइड चार्जर वापरा: नेहमी फोन कंपनीचा ओरिजिनल किंवा सर्टिफाइड ब्रँडेड चार्जरच वापरा. बनावट चार्जर फोनला मिळणाऱ्या विजेचे प्रमाण योग्यरित्या नियंत्रित करू शकत नाहीत, ज्यामुळे बॅटरी खराब होते.

चार्जिंग करताना फोन वापरू नका: चार्जिंग सुरू असताना गेम खेळणे किंवा व्हिडिओ पाहिल्याने बॅटरीवर अतिरिक्त ताण येतो. यामुळे फोन दुप्पट गरम होतो आणि बॅटरी फुगण्याचा किंवा खराब होण्याचा धोका वाढतो.

गरम ठिकाणी चार्जिंग टाळा: थेट सूर्यप्रकाश पडणाऱ्या ठिकाणी किंवा उशीखाली फोन ठेवून चार्ज करू नका. नेहमी थंड आणि हवेशीर ठिकाणीच फोन चार्ज करणे सुरक्षित असते.

थोडक्यात, फक्त २४ तास फोन वापरून चालणार नाही, तर तो योग्यप्रकारे चार्ज कसा करायचा आणि कोणत्या चुका टाळायच्या हे माहित असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.