एका हाताने दिलेले दुसऱ्या हाताला माहिती होऊ न देता अनेकजण दान करत असतात. त्याचप्रमाणे अयोध्येतील राम मंदिरासाठी कर्नाटकच्या एका भक्ताने कोट्यवधी रुपये किमतीची, रत्नांनी जडलेली नवीन राम मूर्ती दान केली आहे.
अयोध्येतील राम मंदिर परिसरात लवकरच एका अमूल्य आणि दुर्मिळ मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. सोन्यासारखी चमकणारी ही भव्य मूर्ती हिरे, पाचूसह अनेक मौल्यवान रत्नांनी सजलेली आहे. ही मूर्ती कर्नाटकातील एका अज्ञात भक्ताने दान केल्याची माहिती समोर आली आहे.ही मूर्ती मुख्य राम मूर्तीची प्रतिकृती असून, दक्षिण भारतीय शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
सुमारे 10 फूट उंच आणि 8 फूट रुंद असलेली ही मूर्ती दक्षिण भारतीय शिल्पकलेच्या तंत्राने बनवण्यात आली आहे. तिची किंमत 25 ते 30 कोटी रुपये असू शकते, असा अंदाज आहे. कर्नाटकातून एका विशेष वाहनाने ही मूर्ती अयोध्येला आणण्यात आली आणि मंगळवारी संध्याकाळी राम मंदिर परिसरात सुरक्षितपणे पोहोचवण्यात आली. सुमारे 1,750 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी 5 ते 6 दिवस लागले.
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांनी सांगितले की, ही मूर्ती कोणी दान केली आहे, हे अद्याप कळलेले नाही आणि मूर्तीचे वजन सुमारे 5 क्विंटल आहे. लवकरच संपूर्ण माहिती दिली जाईल, असेही ते म्हणाले.
ही मूर्ती तुळशीदास मंदिराजवळील अंगद टिला परिसरात स्थापित करण्याचा विचार सुरू आहे. स्थापनेपूर्वी मूर्तीचा अनावरण सोहळा होईल आणि त्यानंतर देशभरातील साधू-संत आणि महात्म्यांच्या उपस्थितीत प्रतिष्ठापना कार्यक्रम होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, ही मूर्ती कर्नाटकातील काही भक्तांच्या एकत्रित प्रयत्नांतून तयार करण्यात आली आहे. तंजावरच्या कुशल शिल्पकारांनी यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही मूर्ती कोणत्या धातूपासून बनवली आहे हे स्पष्ट नसले तरी, ती सोने आणि अनेक रत्नांनी सजलेली आहे.
ही नवीन मूर्ती रामजन्मभूमीत स्थापित केलेल्या राम मूर्तीची प्रतिकृती आहे. राम प्रतिष्ठापनेचा दुसरा वर्धापन दिन 29 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान अंगद टिला परिसरात होणार आहे. या कार्यक्रमांसाठी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी वेदमंत्रांच्या घोषात भूमिपूजन केले.


