अहमदाबादमधील एलिसब्रिज पोलीस ठाण्याजवळ चार तरुणांनी हेल्मेटशिवाय बाईकवर धोकादायक स्टंट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली आहे.

अहमदाबादमधील एलिसब्रिज पोलीस ठाण्याजवळ एकाच बाईकवरून चार जण धोकादायक पद्धतीने प्रवास करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या १० सेकंदांच्या व्हिडिओमध्ये तीन जण बाईकवर बसले आहेत, तर चौथा तरुण चक्क एकाच्या खांद्यावर बसलेला दिसत आहे. ही बाईक भर ट्रॅफिकमधून जात आहे. यापैकी कोणीही हेल्मेट किंवा सुरक्षेची कोणतीही काळजी घेतलेली नाही. त्यांच्या या स्टंटबाजीमुळे रस्त्यावरील इतर लोकांचाही जीव धोक्यात आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एक जण बाईक चालवत होता आणि इतर तिघे त्याच्यासोबत होते. चालकाच्या मागे दोघे बसले होते आणि त्यातील एकाच्या खांद्यावर एक तरुण बसल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. अशाच अवस्थेत ते भररस्त्यातून बाईक चालवत होते.

या चौघांपैकी एकानेही हेल्मेट घातलेले नव्हते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या या बेदरकारपणे गाडी चालवण्यामुळे रस्त्यावरून चालणारे पादचारी आणि इतर वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला होता.

'गुजरात समाचार' या न्यूज पोर्टलने दिलेल्या वृत्तानुसार, ड्युटीवर असताना काही पोलीस अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिला. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एलिसब्रिज पोलिसांना या स्टंटबाजी करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अशोकभाई रमेशभाई ठाकोर (वय ३६), अल्केशभाई हरीशभाई कनोजिया (वय ३७) आणि मितेश केतनभाई झाला (वय २१) अशी या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही अहमदाबादच्या घी-कांटा परिसरातील रहिवासी आहेत. या प्रकरणात पोलीस आता पुढील तपास करत असून आणखी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.