ओडिशामध्ये एका दत्तक मुलीने आईची हत्या केली आहे. पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

भुवनेश्वर : ओडिशातील गजपती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने रस्त्यावरून एका मुलीला उचलून तिला नवीन जीवन दिले, तिचे पालनपोषण केले, पण त्याच मुलीने आईसारख्या महिलेचा जीव घेतला. ही घटना परलाखेमुंडी शहरातील आहे, जिथे ५४ वर्षीय राजलक्ष्मी कर यांची हत्या करण्यात आली. या हत्येचा कट रचला होता त्यांच्या दत्तक मुलीने.

१३ वर्षांपूर्वी रस्त्यावर आढळली होती मुलगी

राजलक्ष्मी कर यांना सुमारे १३ वर्षांपूर्वी एक तीन वर्षांची मुलगी रस्त्यावर आढळली होती. त्यांनी त्या मुलीला आपल्या मुलीप्रमाणे वाढवले, शिक्षण दिले आणि सर्व सुख दिले. पण जेव्हा तीच मुलगी ८वीच्या वर्गात पोहोचली तेव्हा तिने आईसारख्या महिलेला संपवण्याचा कट रचला.

तिघांनी मिळून केली हत्या

पोलिसांच्या मते, मुलीचे दोन पुरुष मित्र होते ज्यांच्याशी असलेल्या संबंधांना राजलक्ष्मी नेहमीच विरोध करत होत्या. याशिवाय मालमत्ता हे देखील एक मोठे कारण होते. २९ एप्रिल रोजी तिघांनी मिळून राजलक्ष्मी यांच्या हत्येचा कट रचला. मुलीने त्यांना प्रथम झोपेच्या गोळ्या दिल्या आणि जेव्हा त्या बेशुद्ध झाल्या तेव्हा उशीने तोंड दाबून त्यांचा जीव घेतला.

पोलिसांनी आरोपींना केले अटक

हत्येनंतर महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नातेवाईकांना सांगण्यात आले की त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. दुसऱ्या दिवशी भुवनेश्वरमध्ये अंत्यसंस्कारही करण्यात आले. सर्व काही मुलीच्या नियोजनानुसार झाले आणि कोणालाही संशय आला नाही. पण काही दिवसांनी पोलिसांना काही धागेदोरे मिळाले आणि जेव्हा इंस्टाग्राम चॅट तपासण्यात आल्या तेव्हा कटाचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.