एका ९ वर्षांच्या मुलाने स्वतःच्या यूट्यूब चॅनेलवर व्ह्यूज वाढवण्यासाठी वडिलांच्या कंपनीचे क्रेडिट कार्ड वापरून तब्बल १.१३ कोटी रुपये खर्च केले. 'मायटी माईक प्लेज' या गेमिंग चॅनेलच्या जाहिरातींसाठी या मुलाने अवघ्या तीन आठवड्यांत एवढी मोठी रक्कम उडवली.

व्हिडिओला जास्त व्ह्यूज मिळावेत या हव्यासापोटी एका ९ वर्षांच्या मुलाने वडिलांच्या कंपनीचे क्रेडिट कार्ड वापरून तब्बल १.१३ कोटी रुपये खर्च केले आहेत. माईक असं या ९ वर्षांच्या मुलाचं नाव असून त्याने यूट्यूब जाहिरातींसाठी १,१८,००० डॉलर्स म्हणजेच सुमारे १.१३ कोटी रुपये उडवले, असा रिपोर्ट 'इंडिया टुडे'ने अमेरिकन मीडियाच्या हवाल्याने दिला आहे.

माईकचं यूट्यूब चॅनेल

हा मुलगा 'मायटी माईक प्लेज' (Mighty Mike Plays) या नावाने यूट्यूब चॅनेल चालवतो. या चॅनेलवर तो प्रामुख्याने माइनक्राफ्ट (Minecraft) आणि रोब्लॉक्स (Roblox) सारख्या गेम्सचे व्हिडिओ टाकतो. पण व्हिडिओंना पुरेसे व्ह्यूज मिळत नसल्याने माईक निराश होता. हे पाहून त्याचे वडील डेव्ह यांनी त्याला यूट्यूबवर जाहिरात कशी द्यायची हे शिकवलं. डेव्ह यांनी २० डॉलर्सच्या छोट्या बजेटमध्ये जाहिरात कशी सेट करायची, प्रेक्षक कसे निवडायचे आणि जाहिरात कशी सुरू करायची हे मुलाला दाखवलं. पण बजेटची मर्यादा माईकला नीट समजली नाही, असं डेव्ह सांगतात.

तीन आठवड्यांत उडवली मोठी रक्कम

पुढच्या तीन आठवड्यांत माईकने स्वतःच यूट्यूबच्या जाहिरात सिस्टीममध्ये जाऊन अनेक जाहिराती सुरू केल्या. डेव्ह यांच्या कंपनीचे क्रेडिट कार्ड आधीपासूनच गुगल अकाउंटला सेव्ह होते. त्यामुळे प्रत्येक नव्या जाहिरातीचे पैसे थेट त्या कार्डमधून कापले गेले. "जास्त पैसे खर्च केले तर जास्त व्ह्यूज मिळतील, असं त्याला वाटलं," असं डेव्ह यांनी माईकच्या चॅनेलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं.

मॅनेजरने केबिनमध्ये बोलावलं

कंपनीच्या मॅनेजर, इतर अधिकारी आणि फायनान्स टीमने जेव्हा डेव्ह यांना मीटिंगसाठी बोलावलं, तेव्हा त्यांना या जाहिरातींच्या खर्चाबद्दल समजलं. अधिकाऱ्यांनी तीन आठवड्यांतील जाहिरातींच्या खर्चाचा सगळा हिशोब डेव्ह यांच्यासमोर ठेवला. आता हे पैसे परत करावे लागतील का किंवा आपली नोकरी जाईल का, याबाबत आपल्याला अजूनही काहीच कल्पना नसल्याचं डेव्ह यांनी म्हटलं आहे.

जाहिरातीचा फायदा झाला का?

या सगळ्यात माईकच्या काही व्हिडिओंना सुमारे २ लाख व्ह्यूज मिळाल्याचा दावा डेव्ह यांनी केला आहे. माइनक्राफ्ट आणि रोब्लॉक्सचे मोठे व्हिडिओ यूट्यूब युजर्सना जाहिरातींच्या रूपात दिसू लागले होते. जेव्हा वडिलांनी या प्रकाराबद्दल माईकला विचारलं, तेव्हा "मी नक्कीच अडकलोय," असं उत्तर त्याने दिलं.

चॅनेल बंद करणार?

या घटनेनंतर हे कुटुंब चॅनेल तात्पुरतं बंद करण्याचा विचार करत आहे. खर्चावर मर्यादा घालणे, पॅरेंटल कंट्रोल सेट करणे आणि अकाउंटमध्ये सेव्ह असलेली पेमेंटची माहिती काढून टाकणे, असे निर्णयही कुटुंबाने घेतले आहेत.

दाव्यांची पुष्टी नाही

दरम्यान, या घटनेची सगळी माहिती डेव्ह यांनी माईकच्या चॅनेलवर टाकलेल्या व्हिडिओतूनच समोर आली आहे. कंपनीकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच, या जाहिरातींच्या खर्चाबाबत कोणताही स्वतंत्र पुरावा किंवा पैशांच्या व्यवहाराची कागदपत्रे समोर आलेली नाहीत. त्यामुळे १.१३ कोटी रुपयांचा खर्च आणि इतर गोष्टी सध्या तरी फक्त डेव्ह यांचे दावे म्हणूनच पाहिले जात आहेत.