नीम करौली बाबांच्या जीवनावरील 'हनुमान अंश' या सिनेमाच्या शो दरम्यान एक विचित्र प्रकार घडला. सिनेमात हनुमान चालीसा सुरु होताच एका महिलेने आरडाओरडा करत विचित्र हावभाव करण्यास सुरुवात केली. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

नीम करौली बाबांच्या जीवनावर आधारित 'हनुमान अंश' हा चित्रपट सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहे आणि बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहे. या सिनेमाने भारतात २७ दिवसांत जवळपास ६१.३८ कोटी रुपये नेट आणि ७२.३२ कोटी रुपये ग्रॉस कमाई केली आहे. सिनेमाच्या कथेने प्रेक्षकांना प्रभावित केलं असून, नीम करौली बाबांवरील श्रद्धा आणि त्यांचे जीवनविचार लोकांपर्यंत पोहोचत आहेत.

'हनुमान अंश'च्या शोमध्ये विचित्र प्रकार

नुकतंच या सिनेमाच्या एका शोमध्ये एक नाट्यमय आणि विचित्र प्रकार घडला, ज्यामुळे उपस्थित प्रेक्षकही चक्रावले. अनेकांनी 'तिच्या अंगात आलंय का?' असा प्रश्न विचारला. झालं असं की, भारतातील एका शहरातील थिएटरमध्ये सिनेमा सुरु असताना, जेव्हा हनुमान चालीसाचा सीन पडद्यावर आला, तेव्हा एक महिला जोरजोरात ओरडू लागली आणि विचित्र हावभाव करू लागली. thebharatvarshinsights नावाच्या एका पेजने हा व्हायरल व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, "'हनुमान अंश'च्या स्क्रिनिंग दरम्यान, सिनेमात हनुमान चालीसा सुरु होताच प्रेक्षकांमधील एका महिलेने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तिचा स्वतःवरील ताबा सुटला होता. हा प्रकार पाहून इतर प्रेक्षकही घाबरले आणि काही जण तिच्या मदतीला धावले. काही जण याला आध्यात्मिक किंवा भक्तीचा अनुभव मानत आहेत, तर काही जणांच्या मते यामागे आकडी येणे, पॅनिक अटॅक किंवा मानसिक आजार अशी वैद्यकीय कारणंही असू शकतात. वैद्यकीय तपासणीशिवाय याचं नेमकं कारण सांगता येणार नाही. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून, नेमकं काय घडलं यावर एक नवीनच चर्चा सुरू झाली आहे."

पाहा व्हायरल व्हिडिओ

View post on Instagram

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने लिहिले, "कदाचित हे मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असू शकतं, जिथे काहीतरी ऐकून व्यक्ती वेगळ्याच झोनमध्ये जाते! मी चुकीचा असू शकेन पण मला असं वाटतं." दुसऱ्याने लिहिले, "मार्केटिंग टीम जबरदस्त आहे." तर आणखी एका युझरने म्हटले, "याच कारणामुळे मी हा सिनेमा पाहिला नाही."