Rakul Preet Singh Ramayana Surpanakha : रामायणमधील शूर्पणखेच्या भूमिकेसाठी रकुल प्रीत सिंगची निवड एकदम परफेक्ट मानली जात आहे. पण शूर्पणखा नक्की होती तरी कोण आणि त्या भूमिकेसाठी रकुलची निवड योग्य का ठरतेय?
मुंबई : पिढ्यानपिढ्या आपण ऐकत आलोय की शूर्पणखा एक खलनायिका होती, जिच्यामुळे रामायणातील युद्धाची ठिणगी पडली. पण जुने ग्रंथ आणि अनेक अभ्यासकांच्या मते, तिची कहाणी खूपच वेगळी आणि गुंतागुंतीची आहे. तिला नेहमी एकाच घटनेसाठी जबाबदार धरलं गेलं, पण तिच्या भावना आणि तिच्यावरील अन्यायाकडे दुर्लक्ष केलं गेलं.
रामायणातील शूर्पणखा
शूर्पणखेच्या दिसण्यापलीकडे तिची कहाणी भावना, अपमान आणि नकाराने भरलेली आहे. याच घटनांनी पुढे रामायणातील मोठ्या संघर्षाला तोंड फोडलं. अनेक पारंपरिक कथांमध्ये तिला एक सुंदर राजकन्या म्हणून वर्णन केलं आहे. नंतरच्या काळात मात्र तिची ओळख फक्त एका खलनायिकेपुरती मर्यादित राहिली. पण आताचे अभ्यासक आणि वाचक तिला खलनायिका नाही, तर पुराणातील एक अत्यंत गुंतागुंतीचं स्त्री पात्र म्हणून पाहतात.
कोण होती शूर्पणखा?
शूर्पणखा ही एक राक्षसी होती आणि हिंदू महाकाव्य रामायणातील राक्षस राजा रावणाची बहीण होती. तिच्या नावाचा अर्थ आहे 'सुपासारखी नखं असलेली'. तिचे वडील ऋषी विश्रवा आणि आई राक्षसी कैकसी होती. रावण, कुंभकर्ण आणि विभीषण हे तिचे भाऊ होते.
प्रेक्षक 'रामायण' सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच, ट्रेलरमध्ये रकुल प्रिंत सिंगची शूर्पणखेच्या भूमिकेतील झलक पाहून सगळेच तिचं कौतुक करत आहेत. तिच्या सौंदर्यामुळे आणि दमदार अभिनयामुळे या भूमिकेसाठी ती अगदी योग्य निवड असल्याचं म्हटलं जातंय. वाल्मिकी रामायणाच्या अनेक कथांमध्ये शूर्पणखेला एक सुंदर, राजघराण्यातील स्त्री म्हणून दाखवलं आहे. त्यामुळे, रकुलची निवड या भूमिकेला न्याय देणारी ठरू शकते.
योग्य निवड
या सगळ्या पार्श्वभूमीवर रकुल प्रीत सिंगची निवड अगदी परफेक्ट वाटते. तिचं सौंदर्य, बोलके डोळे आणि कोणत्याही भूमिकेत शिरण्याची क्षमता यामुळे ती हे पात्र उत्तमरित्या साकारेल अशी खात्री वाटते. 'रामायण'चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर 'शूर्पणखेच्या भूमिकेसाठी सर्वात सुंदर अभिनेत्री निवडली' अशा कमेंट्सचा पाऊस पडत आहे. ट्रेलरवरून तरी असं दिसतंय की, रकुलचा अभिनय या सिनेमातील सर्वात लक्षवेधी गोष्टींपैकी एक असणार आहे.


