बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या खूप भावूक झाला आहे. त्याची दत्तक मुलगी आता सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. तिने एका नेपाळी सिनेमासाठी करार केला आहे. अनेकांना विवेकच्या या दत्तक मुलीबद्दल माहिती नाही. जाणून घेऊया तिची ही खास गोष्ट.
नवी दिल्ली (२३ सप्टेंबर): बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय आणि त्याची पत्नी प्रियांका अल्वा यांना दोन मुलं आहेत. १३ वर्षांचा विहान आणि ११ वर्षांची अमेय निर्वाण ओबेरॉय यांच्याबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. पण या दोघांशिवाय विवेकची एक दत्तक मुलगीही आहे. तिचं नाव सहारा शाह आहे. २२ वर्षांची सहारा आता एका नेपाळी सिनेमातून हिरोईन म्हणून पदार्पण करत आहे.
अडीच वर्षांची असताना घेतलं दत्तक
सहारा अडीच वर्षांची असताना विवेक ओबेरॉयने तिला दत्तक घेतलं होतं. ती खूप लहान असताना तिला कॅन्सर झाला होता. त्यावेळी विवेकने तिला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. फक्त सहाराच नाही, तर कॅन्सरशी लढणाऱ्या अशा अनेक मुलांना विवेकने दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ केला आहे. सहाराला दत्तक घेतल्यानंतर तिच्या उपचारांचा आणि इतर सर्व खर्चाचा भार विवेकने उचलला.
नवं आयुष्य, नवी सुरुवात
एका खाजगी एनजीओच्या माध्यमातून विवेक ओबेरॉयने अनेक मुलांना मदत केली आहे. सहारा शाह एका गरीब कुटुंबातील मुलगी होती. तिचा कॅन्सर खूप वाढला होता आणि तिचे आई-वडील हतबल झाले होते. एनजीओच्या माध्यमातून तिला दत्तक घेतल्यानंतर विवेकने तिच्या उपचारांचा आणि शिक्षणाचा सगळा खर्च उचलला. या चिमुकलीने कॅन्सरशी यशस्वी झुंज दिली. आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर सहाराने आता एका नव्या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.
नेपाळी सिनेमात झळकणार
सहारा शाहची आता एका नेपाळी सिनेमासाठी मुख्य अभिनेत्री म्हणून निवड झाली आहे. तिने या सिनेमाचा करार साईन केला असून आपला आनंद व्यक्त केला आहे. नुकतंच कॅन्सर रोज डे कार्यक्रमात विवेक ओबेरॉय प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. याच कार्यक्रमात सहाराने ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली. ती म्हणाली, "मी लहानपणापासून तुम्हाला बघत मोठी झाले आहे. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले. मी तुमच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत आहे." पुढच्या वर्षी तिचा हा नेपाळी सिनेमा रिलीज होणार असल्याचंही तिने सांगितलं.
"तुमचं प्रेम आणि पाठिंब्यामुळेच हे शक्य झालं," असं सहारा म्हणाली. तिचे हे शब्द ऐकून विवेक ओबेरॉय खूप भावूक झाला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. यावेळी बोलताना विवेक म्हणाला, "मला आज खूप आनंद होत आहे. किमोथेरपी घेताना मी छोट्या सहाराला पाहिलं होतं. अडीच वर्षांच्या त्या चिमुकलीला कॅन्सरच्या वेदनांनी खूप त्रास दिला होता. पण आज ती एका सिनेमाची हिरोईन बनली आहे, हे पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे." असं म्हणत विवेकने आपले अश्रू पुसले.
