बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने आता न्यूट्रिशन बिझनेसमध्ये एन्ट्री मारली आहे. शार्क टँक इंडिया सीझन ४ मध्ये झळकलेल्या 'बेटर न्यूट्रिशन' या ब्रँडमध्ये त्याने गुंतवणूक केली असून तो या ब्रँडचा अँबेसेडरही बनला आहे.

मुंबई : वरुण धवनने आता न्यूट्रिशन इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आहे. शार्क टँक इंडिया सीझन ४ मध्ये झळकलेल्या 'बेटर न्यूट्रिशन' या बायोफोर्टिफाईड स्टेपल्स कंपनीत त्याने गुंतवणूक केली असून तो त्यांचा ब्रँड अँबेसेडरही बनला आहे. वरुणला सध्या शेती आणि शेतजमीन खरेदी करण्यात रस आहे, आणि त्याचाच एक भाग म्हणून त्याने या कंपनीसोबत हातमिळवणी केली आहे.

वरुण आता 'बेटर न्यूट्रिशन'सोबत मिळून त्याच्या शेताचं एका बायोफोर्टिफाईड फार्ममध्ये रूपांतर करणार आहे. नुसती जमीन घेण्यापेक्षा शेतीत काहीतरी नवीन करण्याचा त्याचा विचार आहे. वरुणने सांगितलं की, शेतातील माती, बियाणे आणि तिथे पिकणारं अन्न याबद्दल माहिती घेत असताना त्याला शेती आणि न्यूट्रिशन या दोन्ही गोष्टींचा नव्याने विचार करण्याची प्रेरणा मिळाली.

View post on Instagram
 

वरुण धवनचा नवा बिझनेस

वरुणने नुकतीच काही शेतजमीन खरेदी केली असून तो शेतीचे धडे गिरवत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, वरुण आता 'बेटर न्यूट्रिशन'च्या मदतीने बायोफोर्टिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्या शेतात पीक घेणार आहे.

वरुणने सोशल मीडियावरही या नव्या प्रवासाची माहिती दिली. शेतीतूनच न्यूट्रिशनबद्दलची त्याची आवड निर्माण झाल्याचं त्याने म्हटलं आहे. कंपनीच्या उद्दिष्टांबद्दल त्याला खूप उत्सुकता असून या प्रवासाचा भाग होण्यासाठी तो खूपच एक्सायटेड आहे.

वरुणने या कंपनीत नेमकी किती गुंतवणूक केली आहे, याचा आकडा मात्र अद्याप समोर आलेला नाही.

'बेटर न्यूट्रिशन' नेमकं काय आहे?

'बेटर न्यूट्रिशन' ही कंपनी रोजच्या जेवणातील पीठ, तांदूळ, डाळ आणि भरडधान्य (millets) यावर लक्ष केंद्रित करते. कंपनीचा दावा आहे की, त्यांच्या बायोफोर्टिफाईड उत्पादनांमध्ये नेहमीच्या धान्यांपेक्षा लोह (iron), झिंक आणि इतर आवश्यक मायक्रोन्यूट्रिएंट्स दुप्पट प्रमाणात असतात.

कंपनीच्या मते, त्यांच्या कामाची सुरुवात थेट शेतापासून होते. ते बायोफोर्टिफाईड बियाणे आणि सॉईल-सायन्स (soil-science) पद्धतींचा वापर करतात. पिकांमधील खनिजांची पातळी तपासण्यासाठी आणि त्यांचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू ट्रॅक करण्यासाठी ते एक्स-रे फ्लोरोसेन्स (XRF) तंत्रज्ञानाचा वापर करतात.

View post on Instagram
 

पी. व्ही. सिंधूच्या पावलावर पाऊल

ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने याआधीच 'बेटर न्यूट्रिशन'मध्ये गुंतवणूक केली असून ती या ब्रँडची अँबेसेडर आहे. आता वरुणही तिच्यासोबत या मोहिमेत सामील झाला आहे. चांगलं न्यूट्रिशन हे लोकांसाठी वेगळं काहीतरी न राहता त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनावं, हा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे.

शार्क टँक इंडिया सीझन ४ मध्ये झळकल्यामुळे 'बेटर न्यूट्रिशन'ची भारतीय ग्राहकांमध्ये आणि स्टार्टअप विश्वात चांगलीच ओळख निर्माण झाली आहे. आता वरुण धवनसारखा मोठा बॉलिवूड स्टार सोबत आल्यामुळे कंपनीला नक्कीच मोठा फायदा होणार आहे.

वरुण धवनचे आगामी सिनेमे

वरुण सिनेमांच्या बाबतीतही खूप बिझी आहे. २०२६ मध्ये त्याचे दोन मोठे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. जानेवारीत 'बॉर्डर २' आणि जूनमध्ये 'है जवानी तो इश्क होना है' रिलीज होईल. याशिवाय तो लवकरच 'नो एंट्री २' मध्येही दिसणार आहे.