मराठी अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि अभिनेत्री मृणालिनी जांभळे यांच्यासह काही जणांची गुंतवणुकीच्या आमिषाने सुमारे 47 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.  

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना मोठा धक्का बसला आहे. डोंबिवलीतील बांधकाम प्रकल्पात गुंतवणुकीचे आमिष दाखवत त्यांची आणि इतर काही अभिनेत्रींची एकूण सुमारे 47 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अविनाश जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिवाजी पार्क पोलिस स्थानक येथे तक्रार नोंदवण्यात आली आहे.

अभिनेत्री मृणालिनी जांभळे यांनी दिली तक्रार

या प्रकरणी तक्रार दाखल करणाऱ्यामृणालिनी जांभळे या मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील अभिनेत्री आहेत. त्यांची संशयित आरोपी अविनाश जाधव यांच्याशी व्यावसायिक ओळख होती. जाधव यांनी आपण चित्रपट निर्माता आणि बांधकाम व्यावसायिक असल्याचे सांगत डोंबिवलीतील एका प्रकल्पात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आश्वासन दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

2019 ते 2020 दरम्यान 47 लाखांची गुंतवणूक

तक्रारीनुसार, नोव्हेंबर 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत मृणालिनी जांभळे यांच्या ओळखीने अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि इतर तीन जणांनी मिळून जाधव यांच्याकडे सुमारे 47 लाख रुपये गुंतवले. ही रक्कम चेक आणि ऑनलाइन व्यवहाराद्वारे देण्यात आली होती. जाधव यांनी वर्षभरात मूळ रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले होते.

सुरुवातीला काही पैसे परत, नंतर संपर्क बंद

गुंतवणुकीनंतर सुरुवातीच्या काळात जाधव यांनी सुमारे साडेचार लाख रुपये परतावा म्हणून दिले. मात्र त्यानंतर त्यांनी पैसे देणे बंद केले. तक्रारदारांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण जाधव यांनी मोबाईल क्रमांक आणि पत्ता बदलत संपर्क टाळल्याचा आरोप करण्यात आला आहे.

“जे करायचे ते करा”, आरोपीची धमकी

अखेर तक्रारदारांनी डोंबिवली येथे जाऊन जाधव यांना पैशांबाबत जाब विचारला. त्यावेळी “मी पैसे देणार नाही, जे काय करायचे ते करा,” असे उर्मटपणे उत्तर देत त्यांनी धमकी दिल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यानंतर सर्वांनी मिळून 26 फेब्रुवारी रोजी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांकडून सखोल तपास सुरू

या प्रकरणी आरोपी अविनाश जाधव याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश शेजुल यांच्याकडे सोपवण्यात आला असून पोलीस संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.