एकेकाळी तेलुगू सिनेसृष्टीत सर्वाधिक मागणी असलेली ही अभिनेत्री. पण तिचं आयुष्य अनेक प्रश्न निर्माण करतं. प्रसिद्धी, पैसा आणि यश सगळं काही असूनही चुकीचे निर्णय आणि व्यसनामुळे आयुष्याची कशी राखरांगोळी होते, याचं ती एक जिवंत उदाहरण ठरली.

मुंबई : रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या अभिनेत्रीचं खऱ्या आयुष्यात मात्र खूप दुःख होतं. एकेकाळी तेलुगू सिनेसृष्टीत ती टॉपची कॉमेडी अभिनेत्री होती. तिने तब्बल २०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलं होतं. बड्या स्टार्ससोबत स्क्रीन शेअर करत तिने स्टारडम अनुभवलं. पण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात सगळंच बदलून गेलं.

२०० हून अधिक सिनेमांत झळकलेली स्टार अभिनेत्री! ३० वर्षे सिनेसृष्टीपासून दूर राहण्याची शोकांतिका!

वैयक्तिक आयुष्यातील चढउतार, सिनेमा निर्मितीत झालेलं नुकसान आणि दारूचं व्यसन यामुळे तिच्या करिअरला मोठा फटका बसला. त्यानंतर तब्बल तीन दशके ती सिनेसृष्टीपासून दूर राहिली आणि अज्ञातवासातच तिने जगाचा निरोप घेतला. कोण होती ही अभिनेत्री? चला जाणून घेऊया..

तेनाली ते चेन्नई... अभिनयाचं स्वप्न

तिचं नाव होतं मीना कुमारी! आंध्र प्रदेशातील तेनालीमध्ये जन्मलेल्या मीना कुमारी यांच्या आयुष्याची सुरुवातच अनेक वळणांनी झाली. अगदी लहान वयातच त्यांचं लग्न नेल्लोरचे चित्रपट वितरक वाय. सुब्बाराव यांच्याशी झालं. सुब्बाराव यांनी पत्नीचं सौंदर्य आणि टॅलेंट ओळखलं होतं. तिला मोठी अभिनेत्री बनवण्याचं त्यांचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यांनी मीना कुमारी यांना अभिनय आणि नृत्याचं खास प्रशिक्षण दिलं.

त्यानंतर कामाच्या शोधात हे जोडपं चेन्नईला आलं. सुब्बाराव यांच्या ओळखीने मीना कुमारी यांना १९५८ मध्ये रिलीज झालेल्या 'श्री रामांजनेय युद्धम' या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. अमरनाथ यांनी रामाची तर राजनाला यांनी आंजनेयाची भूमिका साकारलेल्या या सिनेमातून त्यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.

छोट्या भूमिका ते लोकप्रिय कॉमेडी अभिनेत्री

सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करण्याची जिद्द मीना कुमारी यांच्यात होती. सुरुवातीला ज्या भूमिका मिळाल्या त्या त्यांनी स्वीकारल्या. भूमिकेची लांबी न पाहता त्यांनी फक्त अभिनयावर लक्ष केंद्रित केलं. अशा छोट्या भूमिका करता करता त्या कॉमेडी अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू लागल्या.

सुरुवातीला सेटवर जास्त न बोलता फक्त कामापुरतं बोलणाऱ्या मीना कुमारी यांना नंतर ओळखी आणि जनसंपर्क किती महत्त्वाचा आहे हे समजलं. भाषेवर पकड मिळवण्यासाठी त्यांनी कादंबऱ्या वाचायला सुरुवात केली. तमिळ, हिंदी आणि इंग्रजी सिनेमे पाहून त्यांनी डायलॉग डिलिव्हरी सुधारली. या प्रयत्नांमुळे त्यांच्या अभिनयाला आणखी धार आली.

एनटीआर यांच्या सिनेमातही झळकल्या

तेलुगू सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते एन. टी. रामाराव (NTR) आणि दिग्दर्शक के. व्ही. टिळक यांनी मीना कुमारी यांना खूप प्रोत्साहन दिलं. एनटीआर यांच्या अनेक सिनेमांमध्ये त्यांना संधी मिळाली. यावरूनच त्या काळात त्यांची किती डिमांड होती हे लक्षात येतं.

अजिंगाडू बालकृष्ण यांच्यासोबतची मीना कुमारी यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडायची. पद्मनाभम, राजाबाबू यांसारख्या अनेक लोकप्रिय कलाकारांसोबत काम करून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. पण काळ बदलला तसे सिनेसृष्टीत नवीन चेहरे येऊ लागले. अभिनेत्री रमाप्रभा कॉमेडी भूमिकांमध्ये हिट होऊ लागल्या आणि मीना कुमारी यांच्याकडचे सिनेमे हळूहळू कमी होऊ लागले.

सिनेमा निर्मितीच्या स्वप्नाने दिला आर्थिक फटका

करिअर चांगलं सुरू असतानाच मीना कुमारी यांनी निर्माती होण्याचा निर्णय घेतला. १९६८ च्या सुमारास त्यांनी एका लोककथेवर आधारित सिनेमाची निर्मिती सुरू केली. प्रसिद्ध दिग्दर्शक वेदांतम राघवय्या या सिनेमाचं दिग्दर्शन करणार होते. पण शूटिंग सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच पैशांची अडचण आली. परिणामी सिनेमा अर्ध्यातच थांबवावा लागला.

या अपयशामुळे मीना कुमारी यांना मोठा आर्थिक फटका बसला. करिअरचं टेन्शन आणि वैयक्तिक आयुष्यातील समस्या यामुळे त्या खचून गेल्या. महानटी सावित्री आणि सुरभी बालसरस्वती यांसारख्या अभिनेत्रींसोबत त्यांचे जवळचे संबंध होते. याच कठीण काळात त्या दारूच्या आहारी गेल्याचं सांगितलं जातं. या व्यसनातून त्या बाहेर पडू शकल्या नाहीत आणि त्यांचं करिअर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं.

शेवटच्या सिनेमानंतर ३० वर्षांचा अज्ञातवास

१९७७ मध्ये आलेला 'जैती वसंतम' हा मीना कुमारी यांचा शेवटचा सिनेमा मानला जातो. या सिनेमानंतर त्या सिनेसृष्टीपासून पूर्णपणे दूर गेल्या. शेकडो सिनेमांत काम करून प्रेक्षकांची मनं जिंकणारी ही अभिनेत्री नंतर तब्बल ३० वर्षे सार्वजनिक जीवनात कुठेच दिसली नाही.

अखेर १३ ऑगस्ट २००७ रोजी फुफ्फुसाच्या कर्करोगाने त्यांचं निधन झालं. त्यांचा एकुलता एक मुलगा नागराजू सध्या अमेरिकेत स्थायिक असल्याचं सांगितलं जातं.

एकेकाळी तेलुगू सिनेसृष्टीत टॉपवर असलेल्या मीना कुमारी यांचं आयुष्य अनेक प्रश्न निर्माण करतं. प्रसिद्धी, पैसा आणि यश असूनही वैयक्तिक अडचणी आणि चुकीचे निर्णय माणसाचं आयुष्य कसं बदलू शकतात, याचं त्यांचं जीवन हे एक दुःखद उदाहरण आहे.