'द पॅराडाईज' सिनेमातील 'येशनकुला' या नव्या गाण्याचा व्हिडीओ नुकताच रिलीज झालाय. अनिरुद्ध रविचंदरच्या भन्नाट म्युझिकवर नानी आणि कीर्ती सुरेशने एकदम कडक डान्स केलाय.
नानीचा नवा सिनेमा 'द पॅराडाईज' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. श्रीकांत ओडेला या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. श्री लक्ष्मी व्यंकटेश्वर सिनेमाजच्या बॅनरखाली तयार झालेला हा सिनेमा २४ सप्टेंबर २०२६ रोजी थिएटरमध्ये धडकणार आहे. आता मेकर्सनी या सिनेमातील 'येशनकुला' या गाण्याचा व्हिडीओ रिलीज केलाय. अनिरुद्ध रविचंदरने या गाण्याला संगीत दिलंय, तर प्रभा बंगारीगल्ला आणि अद्दुला जांगीरेड्डी यांनी हे गाणं गायलंय. कासरला श्याम यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. या गाण्यात नानी आणि कीर्ती सुरेशचा एकदम भारी डान्स पाहायला मिळतोय.
'जर्सी' आणि 'गँग लीडर' या सिनेमानंतर नानी आणि अनिरुद्ध रविचंदर पुन्हा एकदा 'द पॅराडाईज'च्या निमित्ताने एकत्र आलेत. तसंच, 'दसरा' या ब्लॉकबस्टर सिनेमानंतर नानी आणि दिग्दर्शक श्रीकांत ओडेला यांची जोडी पुन्हा जमली आहे. 'दसरा'चे निर्माते सुधाकर चेरुकुरी हेच या सिनेमाची निर्मिती करत आहेत. या सिनेमात नानी 'जदाल' नावाच्या भूमिकेत दिसणार असून, हा त्याच्या करिअरमधला सर्वात मोठा मास अवतार असल्याचं बोललं जातंय. नानी आणि राघव जुयाल यांच्यासोबतच संपूर्णेश बाबू, मोहन बाबू, सोनाली कुलकर्णी, ईश्वरी राव, राजा रवींद्र, तनिकेला भरणी, एम. एस. चौधरी आणि राम जगन हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा सिनेमा तेलुगू, कन्नड, मल्याळम, तमिळ, हिंदी, बंगाली, इंग्रजी आणि स्पॅनिश अशा एकूण आठ भाषांमध्ये जगभरात रिलीज होणार आहे.
सिनेमाच्या इतर टीमबद्दल सांगायचं तर, श्रीकांत ओडेला यांनीच लेखन आणि दिग्दर्शन केलंय. एसएलव्ही सिनेमाजच्या बॅनरखाली सुधाकर चेरुकुरी यांनी निर्मिती केलीय. सी. एच. साई यांनी कॅमेरा सांभाळलाय, तर नवीन नूली यांनी एडिटिंग केलंय. अविनाश कोल्ला हे प्रोडक्शन डिझायनर आहेत. सारेगामा म्युझिककडे ऑडिओचे हक्क आहेत आणि फर्स्ट शोने मार्केटिंगची जबाबदारी घेतली आहे. शबरी हे या सिनेमाचे पीआरओ आहेत.







