Tanushree Dutta- Nana Patekar : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. २०१८ मधील #MeToo प्रकरणाला उजाळा देत तनुश्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक दावे केले.
मुंबई : बॉलिवूडमध्ये #MeToo चळवळीची सुरुवात करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यावर तिने यापूर्वी केलेल्या आरोपांच्या 'सिक्वेल'मध्ये आणखी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. एका भावनिक व्हिडिओनंतर तिने माध्यमांशी संवाद साधताना आपल्यावर होत असलेल्या छळाची आणि यामागे असलेल्या कथित 'माफिया गँग'ची सविस्तर माहिती दिली आहे.
"माझ्याच घरात माझा छळ!", तनुश्रीचा भावनिक व्हिडिओ
गेल्या काही वर्षांपासून आपल्याला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचं सांगत तनुश्रीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात ती ढसाढसा रडताना दिसली. या व्हिडिओने सोशल मीडियावर एकच खळबळ उडवून दिली. तनुश्रीच्या मते, गेल्या ४-५ वर्षांपासून तिच्या आयुष्यात अनेक विचित्र आणि वाईट घटना घडत आहेत. तिच्या हातातून अनेक फिल्म प्रोजेक्ट्स गेले, लहान-मोठी कामं काढून घेण्यात आली, तसेच तिचे ईमेल, व्हॉट्सॲप आणि फोन नंबरही हॅक करण्यात आले.
खाण्यापिण्यात विष, ऑटोचे ब्रेक कापले?
तनुश्रीने एबीपी माझाशी बोलताना सांगितले की, २०२० मध्ये ती उज्जैनला असताना तिच्या घरात काम करणाऱ्या एका बाईने तिच्या खाण्यापिण्यात काहीतरी मिसळले, ज्यामुळे ती १२-१६ तास बेशुद्ध असायची. इतकंच नाही, तर तिच्या ऑटोचे ब्रेक दोनदा कापले गेल्याचेही तिने सांगितले, ज्यामुळे तिचे अपघात झाले. "माझा पाठलाग केला जातोय, मला फॉलो केलं जातंय, माझ्या घराची चावी कोणाकडे तरी आहे आणि माझ्या घरातील सामान इकडे-तिकडे केलं जातंय," असे गंभीर आरोप तिने केले.
नाना पाटेकर आणि 'बॉलिवूड माफिया गँग'चे कनेक्शन?
या सर्व छळामागे नेमके कोण आहे, असा प्रश्न विचारल्यावर तनुश्रीने थेट नाव घेण्यास टाळले, परंतु २०१८ मध्ये नाना पाटेकरांवर आरोप केल्यानंतरच या घटनांना सुरुवात झाल्याचं तिने नमूद केलं. "नाना पाटेकरांचा यात सहभाग आहे, पण ते एकटे नाहीत. बॉलिवूडमधील माफिया गँग (Bollywood Mafia) आणि अंडरवर्ल्डशी संबंधित काही लोक यात सामील आहेत," असा दावा तिने केला. सुशांत सिंग राजपूतसोबत (Sushant Singh Rajput) जे घडलं, तेच आता आपल्यासोबत होत असल्याचंही तनुश्रीने म्हटलं.
"तो मराठी माणूस म्हणून पोलिसांचा सपोर्ट मिळतो"
या प्रकरणी पुन्हा तक्रार करणार का, असं विचारल्यावर तनुश्री म्हणाली की, कोणत्या प्रकारची तक्रार करायची हे तिला कळत नाहीये, कारण तिचा पाठलाग करणारे लोक नेहमी वेगवेगळे असतात. तिने याआधी तक्रार केली होती, पण "इथे मराठी माणूस, मराठी माणूस करून, आउटसाइडर्स मेला तरी एक मराठी माणूस गुन्हेगार जरी असला तरी त्याला पोलिसांचा सपोर्ट मिळतो," असा गंभीर आरोप तिने केला. मंत्री देखील त्यांना सपोर्ट करतात, त्यामुळे त्यांची हिंमत वाढते आणि त्यांना वाटतं की तनुश्रीला त्रास देऊन संपवून टाकू.
"माझ्या प्रसिद्धीचा गैरवापर" - तनुश्री
नाना पाटेकर हे मोठे अभिनेते नाहीत, असाही दावा तनुश्रीने केला. "२०१८ मध्ये जेव्हा मी त्याच्यासोबत काम केलं, तेव्हा त्याच्याकडे एकही सिनेमा नव्हता. प्रोड्युसर, डायरेक्टर माझ्याकडे भीक मागत आले होते की, तुम्ही सिनेमा केला तर सिनेमा चालेल," असं ती म्हणाली. तनुश्रीच्या मते, तिचा बोलबाला असताना नाना पाटेकरांनी तिच्या प्रसिद्धीचा वापर करून आपलं करिअर वाढवण्यासाठी तिच्यासोबत वाद निर्माण केला.
#MeToo आणि त्यानंतरचे संघर्ष
तनुश्री दत्ताने २०१८ मध्ये नाना पाटेकर यांच्यावर 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या सेटवर गैरवर्तन केल्याचा आरोप करत भारतात #MeToo चळवळीची ठिणगी टाकली होती. या प्रकरणानंतर तिला बॉलिवूडमधून दूर राहावे लागले होते. आता तिच्या नवीन आरोपांनी पुन्हा एकदा सिनेसृष्टीत खळबळ उडवली आहे. तिच्या या धक्कादायक खुलाश्यांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, या प्रकरणाला आता काय वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


