सोशल मीडियावरील बॉडी शेमिंग: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायपासून ते कतरिना कैफपर्यंत अनेक अभिनेत्रींना त्यांच्या वाढलेल्या वजनावरून ट्रोल केलं जात आहे. माणसाची पारख त्याच्या वजनावरून करणाऱ्या सोशल मीडियाच्या या मानसिकतेचा आपण या बातमीत आढावा घेणार आहोत.
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ नुकतीच तिचा नवरा आणि मुलासोबत मुंबईत गणेश चतुर्थीच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यावेळी कॅमेऱ्यात कैद झालेली कतरिना ब्रेकिंग न्यूज बनली. लग्नाआधी झिरो फिगरमध्ये असणारी कतरिना आता जाड झाल्याचं पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. तिचे जुने आणि आताचे फोटो एकत्र जोडून सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.
अभिनेत्रींचं बॉडी शेमिंग करणारे नेटकरी
कतरिनाच्या शरीरात झालेल्या या बदलावर सध्या मोठी चर्चा सुरू आहे. पण हे फक्त कतरिनासोबतच घडलेलं नाही. याआधी 'कान्स २०२६' (Cannes 2026) महोत्सवात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनलाही असंच ट्रोल करण्यात आलं होतं. वजन वाढणं म्हणजे काहींना इतकं वाईट का वाटतं? जास्त वजन असणाऱ्यांना का ट्रोल केलं जातं? या मानसिकतेमागे नेमकं कारण काय आहे?
जाड असण्यात गैर काय?
कतरिना कैफ जेव्हा बारीक होती, तेव्हा तिच्या सौंदर्याचं कौतुक करणारेच लोक आता ती जाड झाल्यावर तिच्याबद्दल वाईट बोलत आहेत. असं का होतं? जाड असणाऱ्यांची समाज का खिल्ली उडवतो?
समाजशास्त्रात याला 'फॅटफोबिया' (Fatphobia) असं म्हणतात. हा फक्त एखादा वैयक्तिक राग नाहीये. तर एखाद्याच्या शरीराच्या आकारावरून त्याला कमी लेखण्याची ही एक अत्यंत वाईट पद्धत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे, भारतीय सिनेमा आणि नाटकांमध्ये जाड लोकांना कायम कॉमेडी पीस म्हणून वापरलं जाणं. २०२५ मध्ये मल्याळम सिनेमाबद्दल आलेल्या एका रिपोर्टमध्ये ही गोष्ट स्पष्टपणे सांगितली आहे.
जाड पात्रांना फक्त विनोदासाठी दाखवल्यामुळे, असे सिनेमे पाहून मोठी होणारी लोकं खऱ्या आयुष्यातही जाड लोकांची खिल्ली उडवायला शिकतात. भारतीय समाजात ही 'बॉडी शेमिंग'ची (Body shaming) संस्कृती सिनेमा आणि नाटकांनीच रुजवली आहे. हे फक्त वजनापुरतं मर्यादित नाही, तर दिव्यांगांची खिल्ली उडवण्याचीही अनेक उदाहरणे देता येतील.
भारतातील लठ्ठपणाची समस्या
एका सर्वेक्षणानुसार, भारतात जास्त वजन असणाऱ्यांपैकी ७१% लोकांना त्यांच्या वजनामुळे स्वतःचाच राग येतो. ७४.६% लोक आपल्या वजनाचा विचार करून डिप्रेशनमध्ये आहेत. निम्म्याहून अधिक लोक स्वतःचाच तिरस्कार करतात. जोपर्यंत वजन कमी होत नाही, तोपर्यंत आपण चांगलं सामाजिक जीवन जगू शकत नाही, असा ५०% लोकांचा समज आहे.
जाड लोक म्हणजे आळशी, कमकुवत किंवा इच्छाशक्ती नसलेले, असाच समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. ही समस्या फक्त बाहेरच नाही, तर ऑफिसमध्येही पाहायला मिळते. ऑफिसमधील सहकाऱ्यांची मानसिकताही अशीच असते. दिल्लीतील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या (MNC) कर्मचाऱ्यांवर केलेल्या एका अभ्यासात असं समोर आलंय की, वजनावरून उडवली जाणारी खिल्ली मोठ्या मानसिक समस्या निर्माण करते. यामुळे जाड लोक इतरांमध्ये सहजपणे मिसळायला घाबरतात.
२००१ मध्ये, येल विद्यापीठातील संशोधक रेबेका पुहल आणि केली ब्राउननेल यांनी एक सत्य उघड केलं. नोकरी, शिक्षण आणि वैद्यकीय उपचारांमध्ये जाड लोकांना मोठ्या भेदभावाला सामोरं जावं लागतं, असं त्यांनी सांगितलं. जास्त वजन असणं ही खूप वाईट गोष्ट आहे, असं २८% शिक्षकांना वाटतं. तर २४% नर्सेस जाड रुग्णांना पाहून नाक मुरडतात.
वैद्यकीय क्षेत्रातही भेदभाव
यात सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, जाड लोक डॉक्टरांकडे जायलाही घाबरतात. डॉक्टर आपली खिल्ली उडवतील या भीतीने अनेक जण उपचारच घेत नाहीत. यामुळे ते मोठ्या नैराश्याचे शिकार होतात.
जाड लोकांशी कसं वागावं?
बाळंतपणानंतर कोणत्याही महिलेचं वजन वाढणं ही अत्यंत नैसर्गिक गोष्ट आहे. त्यासाठी त्यांना ट्रोल करणं किंवा त्या महिलेला माफी मागायला लावणं चुकीचं आहे. त्यांनी कोणत्याही संकोचाशिवाय डॉक्टरांकडे जावं, असं वातावरण आपण निर्माण केलं पाहिजे. ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी, कुणाच्याही जेवणाच्या ताटावर किंवा शरीराच्या आकारावर कोणीही कमेंट करू नये. त्यांच्या पाठीमागे कुजबुजणं किंवा तोंडावर खिल्ली उडवणं टाळलं पाहिजे. शाळांमध्ये बॉडी शेमिंगच्या भीतीने मुलं रडतात, ही परिस्थिती आता बदलली पाहिजे. काळ बदलतोय, तशी आपली विचारसरणीही बदलली पाहिजे.
