अभिनेत्री श्रुती हासनने लग्न, जोडीदार आणि मातृत्वावर तिचं स्पष्ट मत मांडलं आहे. आयुष्यात जोडीदाराची गरज असते, पण त्यासाठी लग्न करणं अजिबात सक्तीचं नाही, असं ती म्हणाली.

अभिनेत्री श्रुती हासन तिच्या खाजगी आयुष्याबद्दल नेहमीच मोकळेपणाने बोलते. लग्न, जोडीदार आणि मातृत्वावर तिने नुकतंच केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खानच्या 'ऑल अबाऊट हर' (All About Her) या पॉडकास्टमध्ये श्रुती सहभागी झाली होती. यावेळी तिने लग्न हेच आयुष्याचं एकमेव ध्येय असू शकत नाही, हे स्पष्ट केलं.

आयुष्यात आपल्याला समजून घेणारा एक जोडीदार असावा, हे खरं आहे. पण त्यासाठी समाजाने आखून दिलेल्या लग्नाच्या चौकटीतच अडकलं पाहिजे, असं काही नाही, असं श्रुती म्हणाली. भूतकाळात आपणही लग्नापर्यंत पोहोचलो होतो, पण खूप विचार केल्यानंतर आपण तो निर्णय बदलला, असा खुलासाही तिने केला.

लग्न म्हणजे फक्त कायदेशीर कागदपत्रांवर सह्या करणं किंवा मोठा सोहळा आयोजित करणं नाही. एकमेकांना आदर देणं, प्रेम करणं आणि रोज एकमेकांना समजून घेत सोबत प्रवास करणं, हेच खरं नातं असतं, असं श्रुतीला वाटतं.

लग्न आणि मुलांबद्दल श्रुतीचं ओपन टॉक

आपण परंपरांचा आदर करतो, असं सांगतानाच श्रुतीने लग्नातील अनावश्यक खर्चावरही बोट ठेवलं. लग्नाच्या नावाखाली दिखाव्यासाठी खूप पैसा खर्च केला जातो. त्यापेक्षा तीच मोठी रक्कम एखाद्या गरजूला किंवा समाजाच्या भल्यासाठी वापरली, तर ते जास्त अर्थपूर्ण ठरेल, असं तिने सुचवलं.

याच पॉडकास्टमध्ये श्रुतीने तिचं आरोग्य आणि मातृत्वावरही मनमोकळ्या गप्पा मारल्या. पूर्वी तिला पीसीओएस (PCOS) चा त्रास होता. त्यामुळे भविष्यात आई होता येईल की नाही, याची तिला भीती वाटायची. जेव्हा जेव्हा ती मुलांबद्दल विचार करायची, तेव्हा तिच्या मनात एक प्रकारची भीती आणि चिंता असायची. पण नुकतंच तिने तिच्या स्त्रीरोगतज्ज्ञांची भेट घेतली आणि त्यानंतर तिची ही भीती दूर झाली आहे. आई होण्याची नैसर्गिक इच्छा आपल्यातही असल्याचं तिने स्पष्ट केलं.

मूल होण्यासाठी लग्न करणं सक्तीचं नाही, हे श्रुतीचं ठाम मत आहे. आजच्या काळात लग्न न करताही आई होण्याचे किंवा मूल दत्तक घेऊन वाढवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. आपल्या आयुष्यातही असे निर्णय घेण्यासाठी आपण खुल्या मनाने विचार करत असल्याचं श्रुतीने सांगितलं.

लग्न आणि मातृत्वाबद्दल श्रुती हासनने मांडलेले हे रोखठोक विचार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या या खाजगी आयुष्यातील निर्णयांवर आणि विचारांवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.