रामानंद सागर यांचे नातू शिव सागर यांनी नितेश तिवारींच्या 'रामायण' सिनेमात रणबीर कपूरच्या निवडीवर नाराजी व्यक्त केली आहे. 'ॲनिमल'मधील भूमिकेनंतर रणबीरला प्रभू राम म्हणून स्वीकारणं कठीण आहे, कारण त्याच्यासोबत एक 'बॅगेज' आहे, असं ते म्हणाले.

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माते रामानंद सागर यांचे नातू आणि दिग्दर्शक-निर्माते शिव सागर यांनी नितेश तिवारींच्या आगामी 'रामायण' सिनेमातील कास्टिंगवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, 'ॲनिमल'सारख्या सिनेमातील भूमिकेनंतर रणबीर कपूरला प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत स्वीकारणं त्यांना 'अशक्य' वाटतं.

'ॲनिमल'नंतर रणबीरला राम म्हणून स्वीकारू शकत नाही'

"या एका कास्टिंगशिवाय मला बाकीची कास्टिंग खूप आवडली आहे. पण 'ॲनिमल' पाहिल्यानंतर मी वैयक्तिकरित्या रणबीर कपूरला राम म्हणून स्वीकारू शकत नाही. जेव्हा मी रामजींकडे पाहतो, तेव्हा मला वाटतं की या भूमिकेसाठी एक नवीन चेहरा घ्यायला हवा होता. तुम्ही यश किंवा साई पल्लवीसारखे कलाकार घेऊ शकता, कारण त्यांच्यासोबत तसं कोणतंही 'बॅगेज' नाही. पण रणबीरसोबत खूप मोठं बॅगेज आहे. म्हणूनच आम्ही आमच्या मालिकांमध्ये सहसा नवीन चेहरे घेतो, जेणेकरून त्यांच्यावर कोणताच शिक्का नसतो," असं शिव सागर म्हणाले.

'काकभुशुंडी रामायण'चे निर्माते असलेल्या शिव सागर यांनी हेही स्पष्ट केलं की, एक अभिनेता म्हणून रणबीरबद्दल त्यांच्या मनात काहीही नाही. "रणबीर एक उत्तम अभिनेता आहे आणि आपण त्याला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे. माझा त्याला वैयक्तिक विरोध नाही. कदाचित सिनेमाला मार्केटिंगमध्ये फायदा व्हावा म्हणून त्याला घेतलं असेल. रणबीर नसता तर सिनेमाचं इतकं चांगलं मार्केटिंग झालं नसतं, हाही एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. पण तरीही मला वाटतं की अशा भूमिकांसाठी नवीन चेहराच योग्य ठरतो," असं त्यांनी सविस्तर सांगितलं.

'रामायण हा आमचा इतिहास आहे, पौराणिक कथा नाही'

याचं कारण सांगताना ते पुढे म्हणाले, "रामायणानंतर तो पुन्हा 'ॲनिमल'सारख्या सिनेमात स्वीकारला जाईल का? विशेषतः जेव्हा प्रभू राम आणि रामायणाचा विषय येतो, तेव्हा लोक खूप भावनिक असतात. ही काही पौराणिक कथा (mythology) नाही. पाश्चिमात्य देशांमध्ये किंवा भारतातही याला 'मायथोलॉजी' म्हटलं जातं, पण हा आमचा इतिहास आहे. लोक रोज त्यांची पूजा करतात; ते आमचा इतिहास आहेत."

शेवटचा निर्णय जनताच घेईल

आपलं मत मांडतानाच, शिव सागर यांनी हेही मान्य केलं की, सिनेमाबद्दलचा अंतिम निर्णय नेहमी प्रेक्षकांच्याच हातात असतो. "खरा राजा तर प्रेक्षकच आहे आणि ते जो निर्णय देतील, तोच अंतिम असेल. मला सिनेमातील काही कलाकारांची निवड आणि वेशभूषा आवडली नाही, ती आणखी चांगली करता आली असती," असं शिव सागर म्हणाले.

सागर कुटुंबाचं स्वप्न साकार, कर्जतमध्ये राम मंदिराची उभारणी

दरम्यान, सागर कुटुंबाचं तीन पिढ्यांपासूनचं एक स्वप्न नुकतंच साकार झालं आहे. महाराष्ट्रातील कर्जतमध्ये एका राम मंदिराची उभारणी पूर्ण झाली आहे. ज्या कुटुंबाचं नाव अनेक दशकांपासून प्रभू राम आणि रामायणाशी जोडलेलं आहे, त्यांच्यासाठी हा एक अत्यंत भावनिक क्षण आहे. या मंदिराची मूळ संकल्पना रामानंद सागर यांची होती. त्यानंतर त्यांचे पुत्र प्रेम सागर यांनी हे काम पुढे नेलं आणि आता नातू शिव सागर यांनी हे स्वप्न पूर्णत्वास नेलं आहे.