अभिनेता सलमान खानने एक मोठा खुलासा केला आहे. करिअरच्या सुरुवातीला वडिलांसाठी महागडं रोलेक्स घड्याळ घेण्यासाठी कर्ज घेतल्याचं त्याने सांगितलं. त्यावेळी त्याच्याकडे पूर्ण रक्कम नव्हती.
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान नेहमीच आपल्या कुटुंबाच्या खूप जवळ राहिला आहे. कोट्यवधींची कमाई करूनही तो आजही मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आपल्या आई-वडिलांसोबत राहतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमानने त्याचे वडील सलीम खान यांच्याशी संबंधित एक भावनिक आणि रंजक किस्सा सांगितला. चित्रपटांमध्ये आल्यानंतर पहिली महागडी वस्तू त्याने स्वतःसाठी नाही, तर वडिलांसाठी खरेदी केली होती. सलमानने खुलासा केला की, त्याने त्यावेळी कर्ज काढून वडिलांना रोलेक्स घड्याळ भेट दिलं होतं. सोबतच, त्याने आपल्या घड्याळांच्या कलेक्शनबद्दलही मोकळेपणाने गप्पा मारल्या.

सलमान खान म्हणाला - 'माझ्याकडे पैसे नव्हते, तरीही बाबांसाठी Rolex घेतलं'
सलमान खानने 'व्हरायटी इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, "मी पहिली महागडी वस्तू माझ्या वडिलांसाठी रोलेक्स घड्याळ खरेदी केली होती. नंतर जेव्हा मी पुन्हा घड्याळं घालायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी तेच घड्याळ मला वापरायला दिलं." सलमान पुढे म्हणाला, “जेव्हा मी ते घड्याळ घेतलं, तेव्हा माझ्याकडे पूर्ण पैसे नव्हते. मला ते बाबांसाठी खूप आवडलं होतं. त्यावेळी त्याची किंमत जवळपास ९ लाख रुपये होती. माझ्याकडे फक्त ४ लाख होते, बाकीचे पैसे मी कर्ज काढून दिले होते.”
सलमान खानवर नाराज झाले होते वडील सलीम खान
सलमानने सांगितलं की, जेव्हा त्याने हे महागडं घड्याळ वडिलांना दिलं, तेव्हा सुरुवातीला सलीम खान खूश नव्हते. सलमानच्या म्हणण्यानुसार, "बाबा मला म्हणाले होते - तू अजून नीट काम करायला सुरुवातही केली नाहीस आणि एवढ्या महागड्या वस्तू खरेदी करू लागला आहेस. स्वतःला कोणी राजा समजतोस का?" पण नंतर सलीम खान यांना ते घड्याळ आवडू लागलं. सलमान म्हणाला, “नंतर ते त्याला 'ज्वेलरी पीस' म्हणायचे. जेव्हा मी पुन्हा घड्याळं घालायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी तेच रोलेक्स मला परत दिलं.”
'माझ्याकडे मोठं वॉच कलेक्शन नाहीये' : सलमान खान
सलमान खानने त्या बातम्यांनाही चुकीचं ठरवलं, ज्यात म्हटलं जातं की त्याच्याकडे कोट्यवधींच्या लक्झरी घड्याळांचं कलेक्शन आहे. तो म्हणाला, "मी माझ्या आयुष्यातील २६-२८ वर्षं घड्याळं घालणं बंद केलं होतं. आज जर तुम्ही मला कोणतं घड्याळ घातलेलं पाहिलं, तर ते माझंच असेल असं नाही. ती माझ्या मित्रांची असतात. मी ती ट्राय करतो आणि परत करतो. लोकांना वाटतं की माझ्याकडे खूप मोठं वॉच कलेक्शन आहे, पण माझ्याकडे फक्त ते एकच रोलेक्स आहे. बाकी सगळी घड्याळं माझ्या मित्रांची आहेत."


