'रामायण' सिनेमाच्या प्रीमियरमध्ये अभिनेत्री सई पल्लवीने रावणाबद्दल मोठं वक्तव्य केलंय. 'रावण पूर्णपणे वाईट नव्हता, आपण आपल्यातल्या चुका ओळखून त्या सुधारल्या पाहिजेत,' असं ती म्हणाली. तिने नेमकं काय सांगितलंय, ते जाणून घेऊया.

बहुचर्चित 'रामायण' सिनेमाचा प्रीमियर लॉस एंजेलिसमध्ये नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला. या सिनेमात सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री सई पल्लवी हिने रामायणाच्या संदेशाबद्दल आपले विचार मांडले. 'रावण पूर्णपणे वाईट नव्हता' या तिच्या वक्तव्याने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

भारतीय सिनेसृष्टीतल्या या सर्वात मोठ्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नितेश तिवारी दिग्दर्शित या भव्य सिनेमाची आणि तगड्या स्टारकास्टची सध्या जोरदार चर्चा आहे. अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसमध्ये या सिनेमाचा खास प्रीमियर पार पडला. या कार्यक्रमाला रणबीर कपूर, सई पल्लवी आणि रॉकिंग स्टार यश यांच्यासह सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

'आपल्यातल्या रावणाला ओळखायला हवं'

लॉस एंजेलिसच्या 'अकॅडमी म्युझियम ऑफ मोशन पिक्चर्स'मध्ये हा कार्यक्रम झाला. तिथल्या रेड कार्पेटवर सई पल्लवीने मीडियाशी संवाद साधला. भारतीय महाकाव्यांबद्दल कुतूहल असलेल्या जगभरातल्या प्रेक्षकांना 'रामायण' एक नवा अनुभव देईल, असा विश्वास तिने व्यक्त केला. अत्याधुनिक व्हीएफएक्स (VFX) तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञांच्या मेहनतीतून हा सिनेमा साकारल्याचं तिने सांगितलं.

रामायणातून आपण कोणता धडा घ्यायला हवा, यावरही सई पल्लवीने भाष्य केलं. ती म्हणाली की, आपण आपल्यातले चांगले आणि वाईट गुण ओळखायला हवेत. आपल्या चुका समजून घेणं आणि त्या सुधारत पुढे जाणं, हे आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे.

'रावणामध्येही चांगले गुण होते'

रावणाच्या पात्राला फक्त वाईट नजरेने पाहण्यापेक्षा, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू आपण समजून घेतले पाहिजेत, अशी आठवण सई पल्लवीने करून दिली. प्रत्येकामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपात नकारात्मक गुण असतातच. ते ओळखून स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करणं, हेच खरं आत्मपरीक्षण आहे, असं तिचं म्हणणं आहे.

रामायण ही फक्त राम आणि रावण यांच्यातल्या युद्धाची गोष्ट नाही. माणसाचे गुण, दोष, नैतिकता आणि आयुष्यातले निर्णय यावर विचार करायला लावणारे हे महाकाव्य आहे. आजच्या पिढीपर्यंत हे विचार पोहोचवण्यात हा सिनेमा महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी आशा सई पल्लवीने व्यक्त केली.

रणबीर बनला राम, तर यश साकारणार रावण

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' हा सिनेमा दोन भागांमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत, सई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सनी देओल हनुमानाच्या आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

नमित मल्होत्रा आणि यश यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. ए.आर. रहमान आणि हॅन्स झिमर या दिग्गजांनी सिनेमाला संगीत दिलंय. भारतीय महाकाव्य जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा या सिनेमाचा उद्देश आहे. आपल्या भव्यतेसोबतच कथेतील संदेशातून हा सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकेल, अशी अपेक्षा आहे.