विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी एका पॉडकास्टमध्ये त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक रंजक गोष्टी शेअर केल्या आहेत. विशेष दिवस साजरे करण्याबाबत विजयचं मत कसं वेगळं आहे, याचा खुलासा रश्मिकाने केलाय.
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा सध्या त्यांच्या आगामी 'रणबाली' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. नुकतंच लग्नबंधनात अडकलेलं हे जोडपं चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एकत्र दिसत असून, त्यांच्यातील केमिस्ट्री आणि गप्पा चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
रश्मिका आणि विजयने नुकतीच सुधीर श्रीनिवासन यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्यांनी यावेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी उलगडल्या. रश्मिकाने अॅनिव्हर्सरी किंवा मन्थ-व्हर्सरीसारखे विशेष दिवस साजरे करण्याबाबत दोघांची मतं कशी वेगळी आहेत, याचा खुलासा केला.
विशेष दिवस साजरे करण्याबाबत विजय कसा आहे?
रश्मिकाने सांगितलं की, विजय देवरकोंडा हा प्रत्येक विशेष दिवस, अॅनिव्हर्सरी किंवा मन्थ-व्हर्सरी साजरी करणारा माणूस नाही. तो अशा दिवसांना फारसं महत्त्व देत नाही. त्याला प्रत्येक महिना किंवा प्रत्येक प्रसंग खास पद्धतीने साजरा करण्यात फारसा रस नसतो. पण विजयने रश्मिकाबद्दल बोलताना दिलेलं उत्तर मात्र लक्षवेधी होतं. "तिने माझ्या आयुष्यात सेलिब्रेशन आणलंय," असं विजय म्हणाला.
'तो हिस्ट्री, लॉजिक आणि सायन्स मानणारा माणूस'
रश्मिकाने यावेळी विजयच्या स्वभावाबद्दलही रंजक माहिती दिली. "तो हिस्ट्री, लॉजिक आणि सायन्स मानणारा माणूस आहे. त्याला प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल असतं," असं रश्मिकाने सांगितलं. याउलट स्वतःच्या स्वभावाबद्दल बोलताना ती म्हणाली की, "मी थोडी 'इमो गर्ल' (इमोशनल) आहे."
अभिनयावरील टीकेला रश्मिकाचं उत्तर
रश्मिकाने आपल्या करिअरमध्ये झालेल्या टीकेवरही भाष्य केलं. काही लोकांनी ती चांगली अभिनेत्री नसल्याची टीका केली होती. यावर बोलताना ती म्हणाली की, एखाद्या अभिनेत्याच्या कामावर दिग्दर्शकाचा मोठा प्रभाव असतो. अभिनेता नेहमीच दिग्दर्शकावर अवलंबून असतो. एखादं पात्र कसं लिहिलंय, याचाही अभिनयावर परिणाम होतो. तसंच दिग्दर्शक ते पात्र प्रेक्षकांसमोर कसं मांडतो, हे खूप महत्त्वाचं असतं, असं तिने स्पष्ट केलं.
'डिअर कॉम्रेड'च्या आठवणींना उजाळा
रश्मिकाने विजय देवरकोंडासोबतच्या 'डिअर कॉम्रेड' या दुसऱ्या चित्रपटाबद्दलही भरभरून गप्पा मारल्या. चित्रपट रिलीज झाला तेव्हा त्याला अपेक्षित व्यावसायिक यश मिळालं नसलं, तरी आजही या चित्रपटाला आणि त्यातील पात्रांना चाहत्यांचं विशेष प्रेम मिळतं. विशेषतः रश्मिकाने साकारलेलं 'लिली' हे पात्र चाहते आजही विसरलेले नाहीत. रश्मिका म्हणाली की, आजही काही लोक मला 'लिली' म्हणूनच हाक मारतात आणि ही माझ्यासाठी छोटी गोष्ट नाही.
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांचा 'रणबाली' चित्रपट सध्या प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये हे दोघे एकत्र दिसणं, हेच मुख्य आकर्षण ठरलंय. त्यांच्यातील मोकळ्या गप्पा आणि वैयक्तिक आयुष्यातील खुलासे चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
