कृष्णा मुखर्जी यांच्या निधनाची बातमी समोर येताच बॉलिवूडमधून शोक व्यक्त केला जात आहे. या कठीण प्रसंगी कुटुंबाने मीडिया आणि चाहत्यांना प्रायव्हसी जपण्याची विनंती केली आहे. अंत्यसंस्काराबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या कुटुंबावर २२ सप्टेंबर २०२६ रोजी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राणीची आई कृष्णा मुखर्जी यांचं मंगळवारी दुपारी वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झालं.
Bollywood Actress Rani Mukerji Mother Krishna Mukerji Death : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्या आई कृष्णा मुखर्जी यांचं निधन
यशराज फिल्म्सने एका अधिकृत निवेदनाद्वारे या दुःखद बातमीला दुजोरा दिला आहे. कुटुंबाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या या निवेदनात कृष्णा मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आलाय. तसेच, या कठीण काळात कुटुंबाला मिळालेले प्रेम, प्रार्थना आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत. यासोबतच कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
कृष्णा मुखर्जी या केवळ राणी मुखर्जीच्या आई नव्हत्या, तर त्यांचा चित्रपटसृष्टीशी थेट संबंध होता. त्यांनी हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये प्लेबॅक सिंगर (पार्श्वगायिका) म्हणून काम केलं होतं. 'मोमर आलो', 'हैवान', 'तिसरी आँख' आणि 'तोमार रक्ते आमार सोहाग' यांसारख्या चित्रपटांशी त्यांचं नाव जोडलं गेलं आहे. उपलब्ध माहितीनुसार, या चित्रपटांमध्ये त्यांनी पार्श्वगायिका म्हणून काम केल्याची नोंद आहे.
कृष्णा मुखर्जी यांचं वैयक्तिक आयुष्यही सिनेसृष्टीशी घट्ट जोडलेलं होतं. प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते राम मुखर्जी यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. राम मुखर्जी हे केवळ दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातच सक्रिय नव्हते, तर ते 'फिल्मालय स्टुडिओ'च्या संस्थापकांपैकी एक होते. या दांपत्याला राणी मुखर्जी आणि राजा मुखर्जी अशी दोन मुलं आहेत. राम मुखर्जी यांचं २०१७ मध्ये वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झालं.
दुसरीकडे, कृष्णा मुखर्जी यांचं बंगाली चित्रपटसृष्टीशीही कौटुंबिक नातं होतं. त्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री देबश्री रॉय यांच्या बहीण होत्या. मुखर्जी कुटुंबाच्या या मोठ्या वर्तुळात काजोल आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांसारख्या अनेक प्रसिद्ध नावांचा समावेश आहे.
राणी मुखर्जीने अनेकदा आपल्या आईबद्दल भरभरून आणि भावुक होऊन सांगितलं आहे. २०२६ च्या सुरुवातीला 'इंडिया टुडे'ला दिलेल्या एका मुलाखतीत राणीने तिच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला होता. एका साध्या बंगाली कुटुंबात आपण कसे वाढलो आणि कुटुंबाने आर्थिक अडचणींचा कसा सामना केला, हे तिने सांगितलं होतं. पण त्या कठीण परिस्थितीतही तिची आई नेहमी हसतमुख असायची. आयुष्यात कोणत्याही परिस्थितीला धैर्याने सामोरं जाण्याची शिकवण आपल्याला आईकडूनच मिळाल्याचं राणीने अभिमानाने सांगितलं होतं.
राणी मुखर्जीचं करिअर घडवण्यातही कृष्णा मुखर्जी यांचा मोठा वाटा होता, हे राणीने यापूर्वी अनेकदा बोलून दाखवलं आहे. अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी आईनेच तिला प्रोत्साहन दिल्याचं राणीने आवर्जून सांगितलं होतं. अलीकडच्या काळातही, आपल्या आयुष्यावर, मूल्यांवर आणि करिअरवर आईचा खूप मोठा प्रभाव असल्याचं तिने मान्य केलं होतं.
कृष्णा मुखर्जी यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण बॉलिवूडमधून शोकसंदेश येत आहेत. मात्र, या दुःखाच्या प्रसंगी कुटुंबाने मीडिया आणि लोकांपासून थोडं दूर राहणं पसंत केलं असून प्रायव्हसीची मागणी केली आहे. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण किंवा अंत्यसंस्काराबाबतचे अधिक तपशील कुटुंबाच्या अधिकृत निवेदनात अद्याप उघड करण्यात आलेले नाहीत.
आईसोबत खूप खास नातं असलेल्या राणी मुखर्जीसाठी हा वैयक्तिक पातळीवर अत्यंत वेदनादायी क्षण आहे. पडद्यावर अनेक सशक्त भूमिका साकारणारी राणी, आज खऱ्या आयुष्यात आईला गमावल्याचं दुःख पचवत आहे. कृष्णा मुखर्जी यांच्या आठवणी आणि त्यांनी दिलेली मूल्यं राणीच्या आयुष्यात कायम सोबत राहतील.


