- Home
- Entertainment
- Nushrratt Bharuccha : बालीमध्ये शूटिंगदरम्यान अपघात, अभिनेत्री नुसरत भरुचाच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर
Nushrratt Bharuccha : बालीमध्ये शूटिंगदरम्यान अपघात, अभिनेत्री नुसरत भरुचाच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर
बालीमध्ये एका अपघातात बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झाले आहे. टायगर श्रॉफच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ही घटना घडली. पुढील उपचारांसाठी तिला मुंबईला आणले जात आहे. यापूर्वीही शूटिंगदरम्यान ती अनेकदा जखमी झाली होती.

पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाला बालीमध्ये एका अपघातात पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झाले आहे. सध्या ती बालीतील एका रुग्णालयात दाखल असून डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे. तिच्या टीमच्या प्रवक्त्या संचिता त्रिवेदी यांनी सांगितले की, सविस्तर तपासणीनंतर डॉक्टर तिच्या पाठीच्या कण्यावर शस्त्रक्रिया करतील. उपचारांसाठी तिला बालीहून विमानाने मुंबईला आणण्याची तयारी सुरू आहे. मुंबईत पोहोचल्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल.

टायगर श्रॉफच्या सिनेमात काम
टायगर श्रॉफच्या आगामी सिनेमात नुसरत काम करत आहे. याच सिनेमाच्या शूटिंगदरम्यान हा अपघात झाला. "कथेला भावनिक खोली आणि ताकद देणाऱ्या अभिनेत्रीची टीमला गरज होती, म्हणूनच नुसरतची निवड झाली," असे टीमने सांगितले. या सिनेमात पश्मिना रोशन, अभिषेक बॅनर्जी आणि एल्विश यादव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. दुखापत आणि शस्त्रक्रियेमुळे नुसरतला आता विश्रांती घ्यावी लागेल. यामुळे आगामी काळात तिच्या कामावर परिणाम होऊ शकतो. सर्वांनी तिच्या प्रायव्हसीचा आदर करावा, अशी विनंती तिच्या टीमने केली आहे.
यापूर्वीही घडल्यात अशा घटना
२०२३ मध्ये शूटिंगदरम्यान नुसरत भरुचा दोनदा जखमी झाली होती. एप्रिल २०२३ मध्ये 'अकेली' सिनेमाच्या सेटवर तिचा अपघात झाला होता. एका धावण्याच्या सीनदरम्यान ती मार्बलच्या फरशीवर तोंडावर पडली होती. या अपघातानंतर ती अर्धा तास वेदनेने रडत होती. डॉक्टरांनी तिला काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला होता. याशिवाय, जानेवारी २०२३ मध्ये 'छोरी २' च्या शूटिंगवेळी एका ॲक्शन सीनमध्ये तिच्या चेहऱ्याला दुखापत झाली होती. दुखापत इतकी गंभीर होती की तिच्या चेहऱ्यावर आणि भुवयांवर टाके घालावे लागले होते.
सेटवर बिघडली होती तब्येत
याआधी ऑगस्ट २०२१ मध्येही शूटिंगदरम्यान नुसरतची तब्येत बिघडली होती. ती लव रंजन यांच्या सिनेमाचे शूटिंग करत होती. सलग २३-२४ दिवस काम केल्यामुळे तिला खूप थकवा आला होता. घटनेच्या दिवशी तिला तीव्र चक्कर आली आणि तिला धड उभेही राहता येत नव्हते. त्यानंतर तिला मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिचा रक्तदाब ६५/५५ पर्यंत खाली आला होता. अति ताण आणि थकव्यामुळे तिला हा त्रास झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. १५ दिवसांच्या विश्रांतीनंतरच तिने पुन्हा शूटिंग सुरू केले.
महाकालेश्वर मंदिर वाद
गेल्या वर्षी नुसरत भरुचाने उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराला भेट दिली होती. तिने महाकालाचे दर्शन घेत भस्म आरतीतही सहभाग घेतला होता. तिने मंदिरातले फोटो शेअर करत "जय श्री महाकाल" असे लिहिले होते. यानंतर, ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी तिच्या मंदिर भेटीला आणि हिंदू प्रथा पाळण्याला कडाडून विरोध केला होता. त्यांनी याला 'गुनाह-ए-अझीम' (महापाप) म्हटले आणि शरियतच्या विरोधात असल्याचे सांगून तिला कलमा वाचण्याचा सल्ला दिला होता.
बोहरा मुस्लिम कुटुंब
नुसरत एका मुस्लिम बोहरा कुटुंबातील आहे. मात्र, तिचे कुटुंब लहानपणापासूनच सर्व धर्मांचा आदर करत आले आहे, असे तिने अनेकदा सांगितले आहे. नुसरतच्या मते, ती मंदिरांसोबतच गुरुद्वारा आणि चर्चमध्येही जाते. तिने वैष्णोदेवी आणि केदारनाथलाही भेट दिली आहे आणि ती तिथेही प्रार्थना करते.

