नयनतारा मुख्य भूमिकेत असलेला 'मुकुथी अम्मन २- महाशक्ती' हा चित्रपट ६ नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये धडकणार आहे. सुंदर सी दिग्दर्शित या चित्रपटात उर्वशी आणि योगी बाबू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

नयनतारा मुख्य भूमिकेत असलेला 'मुकुथी अम्मन २- महाशक्ती' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. ट्रेलरवरून असा अंदाज येतोय की, या चित्रपटात सध्याच्या घडामोडी आणि भूतकाळातील घटनांचा सुरेख मेळ पाहायला मिळेल. नयनतारा या चित्रपटात मुकुथी अम्मन आणि एका पोलीस अधिकाऱ्याच्या अशा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून 'UA' प्रमाणपत्र मिळालं आहे. चित्रपटाची एकूण लांबी २ तास २५ मिनिटे इतकी आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे केरळमधील वितरण हक्क भावना स्टुडिओने (Bhavana Studios) विकत घेतले आहेत.

या चित्रपटात अभिनेत्री उर्वशी यांनी आईची भूमिका साकारली आहे. सुंदर सी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, ६ नोव्हेंबरला दिवाळीच्या खास मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी रिलीज झालेल्या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या 'मुकुथी अम्मन'च्या पहिल्या भागानंतर, आता भक्ती, विनोद आणि सामाजिक संदेश यांचा मेळ घालत दुसरा भाग 'महाशक्ती' प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात नयनतारा, दुनिया विजय, रेजिना कॅसांड्रा, उर्वशी, योगी बाबू, मैना नंदिनी, गरुडा राम, अभिनया, श्रुती एस., सिंगमपुली अण्णावी, व्ही.आर. स्वामीनाथन, शिवकुमार एस., सुनील वर्मा इंदुकुरी, वर्षिनी व्यंकट, पाला करुप्पय्या, आनंदा अधिष्ठ लक्ष्मी, नितीन सत्या आणि देबलीना चाकी यांसारख्या तगड्या कलाकारांची फौज आहे.

भव्य सेट्स, डोळे दीपवणारे दृश्य आणि सुंदर सी यांच्या खास शैलीतील भक्ती, रहस्य आणि मास एंटरटेनमेंटचा तडका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. वेल्स फिल्म्स इंटरनॅशनलच्या बॅनरखाली डॉ. इषारी के. गणेश यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'महाशक्ती'चं लेखन आणि दिग्दर्शन सुंदर सी यांनी केलं असून, हिप-हॉप तमिझा यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. खुशबू सुंदर, कुश्मिता गणेश, इशान सक्सेना आणि विघ्नेश शिवन हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर, चित्रपटाचे पीआरओ म्हणून प्रतीश शेखर काम पाहत आहेत.