Kriti Sanon on Kangana Ranaut Over Rakhi Ad Outfit : रक्षाबंधनानिमित्त एका जाहिरातीत इंडो-वेस्टर्न कपडे घातल्यामुळे अभिनेत्री क्रिती सेननला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. कंगना रणौतनेही या जाहिरातीला 'विचित्र' म्हटलं होतं. आता क्रितीने या संपूर्ण वादावर मौन सोडलं आहे.

मुंबई : अभिनेत्री क्रिती सेनन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. रक्षाबंधनाच्या एका जाहिरातीमध्ये तिने ब्लालेट-स्टाईल इंडो-वेस्टर्न ड्रेस घातल्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला. अनेकांनी तिच्यावर 'परंपरेचा अपमान' केल्याचा आरोप केला. 'ईदच्या जाहिरातीत असे कपडे घालण्याची हिंमत केली असती का?' असे प्रश्न विचारत तिला ट्रोल करण्यात आलं.

क्रितीचं ट्रोलर्स आणि कंगना रणौतला प्रत्युत्तर

फक्त नेटकरीच नाही, तर भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतनेही क्रितीवर टीका करत त्या जाहिरातीला 'विचित्र' (Creepy) म्हटलं होतं. आता अखेर क्रितीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत या संपूर्ण वादावर आपली भूमिका मांडली आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं, "सणांचं महत्त्व तुम्ही कोणत्या कपड्यात आहात यात नाही, तर तुमच्या मनात असलेल्या भावना आणि परंपरेच्या अर्थात दडलेलं आहे. रक्षाबंधन हे संरक्षणाचं बंधन आहे. मी आणि माझी बहीण एकमेकांना राखी बांधतो. आम्हाला माहित आहे की, आम्ही एकमेकींचं संरक्षण एखाद्या भावापेक्षा कमी करणार नाही."

क्रिती पुढे म्हणाली, "आम्ही एकमेकींच्या चांगल्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. आमच्यासाठी ही प्रार्थना आणि वचन आमच्या कुत्र्यांसाठीही आहे! कारण तेही आमचं कुटुंब आहेत! आणि हो, आपण महिलांना काय घालायचं हे सांगणं कधी थांबवणार आहोत? गेल्या काही वर्षांत एथनिक फॅशन खूप बदलली आहे, पण आजही एखाद्या स्त्रीचा तिच्या संस्कृतीबद्दलचा आदर फक्त तिच्या कपड्यांवरून मोजला जातो! संस्कृती आणि परंपरा तिच्या मनात असते, तिच्या नेकलाईनमध्ये नाही!"

क्रितीची पोस्ट -

कंगना काय म्हणाली होती?

कंगनाने क्रितीचं नाव न घेता लिहिलं होतं, "आजच्या काळात स्त्री असणं ही एक अद्भुत गोष्ट आहे. आपले वॉर्डरोब वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांनी भरलेले आहेत. आजची स्त्री ग्लोबल आहे, कॉकटेल ड्रेसपासून लेहेंगा-चोलीपर्यंत, जीन्सपासून साडीपर्यंत, बिकिनीपासून सलवार-कमीजपर्यंत... आपल्याकडे आज इतके पर्याय उपलब्ध असताना तुम्ही तुमच्या भावाला बिकिनी/अंतर्वस्त्रांमध्ये राखी का बांधाल? तुमचे बाकीचे स्टायलिंगचे पर्याय कुठे गेले? हा हा, ही जाहिरात मुद्दामहून विचित्र वाटावी अशी बनवली आहे."