सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'जेलर २' चित्रपटाची स्टोरी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. निवृत्त जेलर टायगर मुथुवेल पांडियनच्या शांत आयुष्यात पुन्हा वादळ येणार असल्याची चर्चा आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'जेलर २' या बहुप्रतिक्षित चित्रपटाची सध्या प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित या चित्रपटात रजनीकांत पुन्हा एकदा 'टायगर' मुथुवेल पांडियनच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता चित्रपट रिलीज होण्याआधीच त्याच्या कथेबद्दलची माहिती सोशल मीडिया आणि सिनेसृष्टीत वेगाने व्हायरल होत आहे.

तमिळ सिनेसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तर धुमाकूळ घालतातच, पण प्रेक्षकांमध्येही त्यांची मोठी क्रेझ असते. या वयातही बॅक टू बॅक चित्रपटांमध्ये बिझी असलेल्या रजनीकांत यांच्या एनर्जीचं चाहते नेहमीच कौतुक करतात.

आता रजनीकांत यांचा पुढचा मोठा चित्रपट म्हणजे 'जेलर २'. दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. चित्रपटाच्या रिलीजची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी याच्या कथेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

हीच आहे का 'जेलर २' ची खरी स्टोरी?

सध्या सिनेसृष्टीत व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारी जगतातून आलेली एक नवी धमकी निवृत्त जेल अधिकारी 'टायगर' मुथुवेल पांडियन यांचं शांत आयुष्य उद्ध्वस्त करते. आपल्या कुटुंबाचं आणि प्रतिष्ठेचं रक्षण करण्यासाठी मुथुवेल पांडियनला पुन्हा एकदा आपल्या जुन्या, डॅशिंग आणि ॲक्शन अवतारात परतावं लागतं, असा या व्हायरल कथेचा मुख्य गाभा आहे.

त्यामुळे 'जेलर' चित्रपटात प्रेक्षकांची मनं जिंकणारा टायगर मुथुवेल पांडियन पुन्हा त्याच मास अवतारात धुमाकूळ घालणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र, सध्या व्हायरल होत असलेल्या या कथेवर चित्रपट टीमकडून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही. चित्रपट रिलीज झाल्यानंतरच खरी कथा काय आहे, हे स्पष्ट होईल.