सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'जेलर 2' चित्रपटाला रिलीजआधीच प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. या सिनेमाने तमिळनाडूमध्ये ॲडव्हान्स बुकिंगमध्येच १० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. देशभरात चित्रपटाने किती कमाई केलीय, ते जाणून घेऊया.
'जेलर 2' च्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये रजनीकांत यांचा जलवा!
सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'जेलर 2' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपट रिलीज व्हायला अजून दोन दिवस बाकी आहेत, पण तमिळनाडूमध्ये पहिल्या दिवसाच्या ॲडव्हान्स बुकिंगने १० कोटी रुपयांचा आकडा पार केलाय. आता नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित हा सिनेमा थलपती विजयच्या 'लिओ' आणि 'GOAT' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
चेन्नईमध्ये चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला उधाण आलंय. अजूनही तिकीट बुकिंग सुरू असल्याने तमिळनाडूमध्ये पहिल्या दिवसाच्या बुकिंगचा हा एक मोठा विक्रम ठरू शकतो. ट्रेड ट्रॅकर सॅकनिल्कच्या (Sacnilk) रिपोर्टनुसार, 'जेलर 2' ने तमिळनाडूमध्ये ब्लॉक सीट्ससह १० कोटींहून अधिक ग्रॉस कमाई केलीय. राज्यात ३,३०० पेक्षा जास्त शोजसाठी तिकीट बुकिंग झालं असून, त्यातील ५०० हून अधिक शोज आताच हाऊसफुल्ल झालेत. बुकिंगचा शेवटचा टप्पा अजून बाकी असल्याने, पहिला शो सुरू होण्यापूर्वी हे आकडे आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ॲडव्हान्स बुकिंगमध्ये चेन्नई नंबर १!
तमिळनाडूमध्ये 'जेलर 2' च्या पहिल्या दिवसाच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये चेन्नई शहर आघाडीवर आहे. शहरात १,००० हून अधिक शोजच्या माध्यमातून ब्लॉक सीट्ससह ४.८० कोटी रुपयांपेक्षा जास्त ग्रॉस कमाई झालीय. म्हणजेच, संपूर्ण तमिळनाडूच्या एकूण ॲडव्हान्स बुकिंगमध्ये जवळपास अर्धा वाटा एकट्या चेन्नईचा आहे.
कोईम्बतूरमध्येही चित्रपटाने ब्लॉक सीट्ससह १ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडलाय. त्रिची आणि मदुराई या शहरांमधूनही ॲडव्हान्स बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळतोय. राज्यभरातील हे आकडे पाहता, चित्रपट रिलीज होण्याआधीच प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता असल्याचं स्पष्ट होतंय.
देशभरात 'जेलर 2' ची २१ कोटींच्या पार झेप!
'जेलर 2' ची क्रेझ फक्त तमिळनाडूपुरती मर्यादित नाही. देशभरात पहिल्या दिवसाच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ब्लॉक सीट्ससह चित्रपटाने २१ कोटी रुपयांपेक्षा जास्त ग्रॉस कमाई केलीय. तमिळनाडूनंतर केरळ आणि कर्नाटक या राज्यांमधून ॲडव्हान्स बुकिंगला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे.
