गुरु रंधावा तब्बल तीन वर्षांनंतर लाईव्ह कॉन्सर्टमध्ये परतत आहे. १२ डिसेंबर २०२६ रोजी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर त्याचा 'द सिरा एरा लाईव्ह इन कॉन्सर्ट' होणार आहे. संगीत क्षेत्रातील १३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा शो होत असून, आपल्या गाण्यांविरुद्ध मुद्दाम द्वेष पसरवला जात असल्याचा दावाही त्याने केलाय.
१२ डिसेंबर २०२६ ही तारीख लक्षात ठेवा. तब्बल तीन वर्षांच्या ब्रेकनंतर गुरु रंधावा पुन्हा एकदा स्टेजवर परततोय. नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर तो 'द सिरा एरा लाईव्ह इन कॉन्सर्ट' (The Sirra Era Live In Concert) हा त्याचा पहिला सोलो स्टेडियम कॉन्सर्ट करणार आहे. संगीत क्षेत्रात त्याने १३ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यामुळे हा क्षण त्याच्यासाठी आणि चाहत्यांसाठी खूप खास आहे. नुकत्याच झालेल्या टिकेवरही त्याने भाष्य केलंय. आपल्या गाण्यांविरुद्ध 'टार्गेटेड कॅम्पेन' चालवून मुद्दाम द्वेष पसरवला जात असल्याचा दावा त्याने केलाय.
२०२३ मध्ये रंधावाने टूरिंगमधून ब्रेक घेतला होता. या काळात त्याने खाजगी आयुष्यात अनेक संघर्ष पाहिले आणि स्वतःला पुन्हा सावरलं. या वेळेत त्याने इंडिपेंडेंट म्युझिकवर लक्ष केंद्रित केलं आणि ही गाणी खूप हिट झाल्याचं तो सांगतो.
'द सिरा एरा लाईव्ह इन कॉन्सर्ट'चे डिटेल्स
दिल्लीत होणाऱ्या या कॉन्सर्टला रंधावाने 'एक जबरदस्त होमकमिंग' म्हटलंय. कारण याच शहराने त्याला सुरुवातीच्या काळात स्टार बनवलं. सारेगामा लाईव्ह, वॉर्नर म्युझिक आणि RTHYMS यांच्या सहकार्याने हा कॉन्सर्ट प्रोड्यूस करत आहे. यात 'लाहोर', 'हाय रेटेड गबरू', 'सूट सूट' आणि 'पटोला' यांसारखी जुनी हिट गाणी ऐकायला मिळतील. सोबतच 'डोपामिन', 'अझुल' (AZUL) आणि 'सिरा' या नव्या गाण्यांचाही तडका असेल. झोमॅटोच्या 'डिस्ट्रिक्ट' (District by Zomato) वरून तिकीट बुकिंग करता येईल. २०२३ नंतर राजधानी दिल्लीत होणारा हा त्याचा पहिलाच मोठा लाईव्ह शो आहे. याआधी २०२२ मध्ये त्याने शेवटची मोठी डोमेस्टिक टूर केली होती.
"टार्गेटेड कॅम्पेन" वरून पलटवार
आपल्या गाण्यांबद्दल मुद्दाम द्वेष पसरवण्यासाठी 'टार्गेटेड कॅम्पेन' चालवली जात असल्याचा आरोप रंधावाने केलाय. त्याच्या गाण्यांवरून झालेल्या अनेक विवादांनंतर त्याने हे वक्तव्य केलंय. ऑगस्ट २०२६ मध्ये त्याच्या 'फाईन शिट' (Fine Shyt) या गाण्यावर सोशल मीडियावरून जोरदार टीका झाली होती. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये महिलांना ज्या प्रकारे दाखवलंय आणि त्याचे जे बोल आहेत, ते महिलांचा अपमान करणारे असल्याचं म्हणत त्याला ट्रोल करण्यात आलं. यावर रंधावानेही सडेतोड उत्तर दिलं. तो म्हणाला की हा फक्त एक "छोटासा स्लँग" (silly little slang) आहे. त्याने सोशल मीडिया युजर्सना "शांत राहण्याचा" सल्ला दिला. शिवाय, "तुमच्या डोक्यात कायम वाजत राहतील अशी गाणी बनवल्याचा आरोप मी आनंदाने स्वीकारतो," असा टोलाही त्याने लगावला.
२०२५ मध्ये त्याच्या 'अझुल' (Azul) या गाण्यावरूनही वाद झाला होता. या गाण्यात शाळकरी मुलींना चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आणि शिक्षक-विद्यार्थी नात्याचं चुकीचं चित्रण केल्याचा आरोप झाला. याच काळात रंधावाने इन्स्टाग्रामवर काही गूढ पोस्ट केल्या होत्या. "जेव्हा मी सर्वांना खूश करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी दुःखी होतो. आज जेव्हा मी खूश आहे, तेव्हा बाकी सगळे दुःखी आहेत," असं त्याने लिहिलं होतं. 'सिरा' या गाण्यावरून लुधियाना कोर्टानेही त्याला समन्स बजावलं होतं. या गाण्यातून ड्रग्ज संस्कृतीला प्रोत्साहन दिल्याचा आणि जाट समुदायाची बदनामी केल्याचा आरोप त्याच्यावर होता. ऑगस्ट २०२६ मध्ये त्याने आपलं एक्स (पूर्वीचं ट्विटर) अकाऊंट डिलीट केलं. दिलजीत दोसांझला उद्देशून त्याने एक पोस्ट केली होती, ज्यावरून मोठा वाद निर्माण झाला आणि त्यानंतर त्याने हे पाऊल उचललं.
