अभिनेता गोविंदाने अखेर पत्नी सुनीता आहुजाच्या टीकेवर मौन सोडलं आहे. आपल्या करिअरला धक्का लागेल अशी वक्तव्यं करणं थांबव, असं आवाहन त्याने सुनीताला केलं आहे. तरुण सह-कलाकारासोबत दिसल्याने सुनीताने केलेल्या टीकेला गोविंदाने उत्तर दिलं आहे.

अभिनेता गोविंदाने पत्नी सुनीता आहुजाच्या अलीकडच्या जाहीर टीका-टिप्पणीनंतर अखेर मौन सोडलं आहे. एका व्हिडिओ मेसेजमधून गोविंदाने सुनीताला अशी वक्तव्यं न करण्याची विनंती केली आहे, ज्यामुळे त्याची प्रतिष्ठा, करिअर आणि इंडस्ट्रीतील स्थान धोक्यात येऊ शकतं.

गोविंदाला करिअरची चिंता

गोविंदाने आठवण करून दिली की, त्याने सुनीताच्या व्यावसायिक कामांना नेहमीच पाठिंबा दिला आहे. तो म्हणाला, "जेव्हा तू 'लाफ्टर शेफ्स' आणि 'लॉक अप' सारखे तुझे स्वतःचे शो करत होतीस, तेव्हा तू टीनाला (त्यांची मुलगी) दोन्ही शो करायला सांगितले. तू माझ्याकडून हे करून घेतलंस. असो, तो तुझा हक्क आहे."

यानंतर गोविंदा आपल्या करिअरबद्दल बोलला. तो म्हणाला की, त्याने आता एका चित्रपटाचं काम सुरू केलं आहे आणि त्याला लोकांच्या मनात इतक्या वर्षांपासून कमावलेली जागा गमावायची नाहीये. "आणि आता मी चित्रपट सुरू केला आहे, तर तू मला लोकांच्या मनातून उतरवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीयेस. मला लोकांच्या मनातील माझं स्थान गमावायचं नाही. मला माझी बदनामी नकोय आणि माझा व्यवसायही गमावायचा नाही," असं गोविंदा म्हणाला.

'नव्या कलाकारांची बदनामी करू नका'

गोविंदा म्हणाला की, सार्वजनिक टीका इतकी टोकाची नसावी की इंडस्ट्रीत येणारे नवीन कलाकार घाबरून आपलं करिअरच सोडून देतील. "जेव्हा गरीब घरातून लोक फिल्म लाईनमध्ये येतात, तेव्हा त्यांची इतकी बदनामी करू नका की ते घाबरून पळून जातील. तुझ्याकडे क्षमता, ताकद, प्रसिद्धी, सन्मान, पैसा सगळं आहे. देवाने तुला सर्व काही दिलं आहे. याचा अर्थ असा नाही की ज्यांच्याकडे हे नाही, त्यांचा तू अपमान करावा. हे तुला शोभत नाही," असं त्याने सुनावलं.

मोठ्या कलाकारांनी तरुण कलाकारांसोबत काम करण्याच्या कल्पनेचंही त्याने समर्थन केलं. तो म्हणाला की, अशाप्रकारच्या कामांमुळेच पूर्वी अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना चित्रपट, ओळख आणि सन्मान मिळाला. "देशातील सर्व मोठ्या कलाकारांनी त्या सर्व मुलींसोबत काम केलं ज्या तरुण होत्या. त्यांना चांगले चित्रपट, प्रसिद्धी आणि सन्मान मिळाला," असं सांगत आपल्यालाही तरुण कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळायला हवी, असं गोविंदा म्हणाला.

सुनीताला थेट आवाहन

व्हिडिओच्या शेवटी गोविंदाने थेट सुनीताला आवाहन केलं. तो म्हणाला की, भविष्यात त्यांना एकमेकांची गरज भासू शकते. "आणि मला वाटतं की भविष्यात कधी ना कधी तुला माझी गरज लागेल. त्यामुळे कृपया अशी वक्तव्यं करू नकोस," असं तो म्हणाला.

सुनीता आहुजाने मीडियामध्ये केलेल्या वक्तव्यांचा उल्लेख करत, याला आपला अपमान असल्याचं गोविंदाने म्हटलं. "कृपया आपल्या मर्यादेत राहा. मी तुला प्रार्थना करतो," असंही गोविंदा म्हणाला.

वादाची ठिणगी कुठे पडली?

गोविंदा त्याच्या 'रूपा' या सिनेमाची सह-कलाकार राणी स्वर्णकारसोबत दिसल्यानंतर या वादाला तोंड फुटलं. गोविंदा आणि राणी पापाराझींसाठी पोज देत असतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर, मीडियाशी बोलताना सुनीताने गोविंदाच्या या प्रमोशनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं होतं की, “पिक्चर बनायला पण पाहिजे ना... मुलीच्या वयाच्या मुलीला घेऊन फिरतोय, लाज वाटायला पाहिजे थोडी याला. थोडं स्टँडर्ड पाहिजे. खूप वाईट. याचं डोकं फिरलं आहे.”