फाल्गुनी पाठकच्या नवरात्री उत्सवाचे तिकीट दर पाहून मुंबईतील गरबाप्रेमी नाराज झाले आहेत. प्रीमियम पासची किंमत तब्बल २.०४ लाख रुपये ठेवल्याने अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

मंबई : यावर्षी गरब्याचा प्लॅन करताय? मग खिसा जरा जास्तच गरम ठेवावा लागणार आहे! कारण फाल्गुनी पाठकच्या नवरात्री उत्सव २०२६ च्या एका पासची किंमत आहे तब्बल २.०४ लाख रुपये. हे दर पाहून मुंबईतील अनेक गरबाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून, 'फल्लू, तू खूप महाग झालीस!' अशी कमेंट सध्या व्हायरल होत आहे.

नवरात्री म्हणजे मुंबईत नऊ रात्री चालणारा एक मोठा उत्सव. फाल्गुनी पाठकच्या गाण्यांवर गरबा खेळायला मोठी गर्दी जमते. तिचा उत्साहपूर्ण गरबा आणि दांडिया हा या सणाचा मुख्य भाग असतो. पण यावर्षी कार्यक्रमाच्या तिकीट दरांमुळे तो चर्चेत आला आहे.

काय आहे २.०४ लाखांचं 'पॉड पॅकेज'?

येत्या ११ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये फाल्गुनी पाठकचा नवरात्री उत्सव होणार आहे. यात नऊ रात्री गरबा आणि दांडियाची धूम असेल. पण इथल्या 'पॉड पॅकेज' नावाच्या प्रीमियम तिकीट कॅटेगरीची किंमत तब्बल २.०४ लाख रुपये आहे.

हा पास एका रात्रीसाठी असून, यात १२ जण सहभागी होऊ शकतात. या पॅकेजमध्ये १०,००० रुपयांचे फूड आणि बेव्हरेज कुपनही दिले जाणार आहे. त्यामुळे एका रात्रीच्या गरब्यासाठी हा मोठा खर्च आहे.

बुक माय शो (Book My Show) नुसार, एका दिवसाच्या तिकीटाची किंमत २,२०० रुपयांपासून (कर वगळून) सुरू होते. ज्यांना नऊ रात्रींचा सिझन पास हवा होता, त्यांच्यासाठी सुरुवातीला 'अर्ली बर्ड' फेज १ मध्ये १६,००० रुपये, फेज २ मध्ये १८,००० रुपये आणि आता २०,००० रुपये प्रति व्यक्ती दर ठेवण्यात आला आहे.

गरबाप्रेमींची नाराजी

एका युजरने इन्स्टाग्रामवर लिहिलं, "मला फाल्गुनी पाठक खूप आवडते आणि मी तिच्या गरबा शोसाठी वर्षभर वाट पाहते. पण जिओ कन्व्हेन्शन सेंटरसारखं ठिकाण निवडल्यामुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना हा खर्च परवडणारा नाही. नवरात्री आणि गरबा लोकांना एकत्र आणण्यासाठी असतो, पैशांमुळे त्यांना दूर ठेवण्यासाठी नाही. भविष्यात कार्यक्रम आयोजित करताना परवडणाऱ्या दरांचा विचार केला जाईल, अशी आशा आहे." तर दुसऱ्याने लिहिलं, "फल्लू, तू खूप महाग झालीस."

एका चाहत्याने आपली आठवण शेअर केली, "मॅडम, तुम्ही जेव्हा बोरिवलीत यायचात, तेव्हा ३०,००० लोक तुमच्या तालावर नाचायचे. आम्हाला नवरात्रीत तुमच्या संगीताचा आनंद घेण्यासाठी जिओ किंवा कोणत्याही हाय-एंड एसी जागेची गरज नाही. आम्हाला फक्त तुमचं परफॉर्मन्स, तुमचं संगीत आणि परवडणारे पास हवे आहेत, जेणेकरून प्रत्येकजण तुम्हाला LIVE पाहू शकेल! जर ९ दिवसांसाठी २३,००० रुपये असतील, तर आम्ही पार्किंग, पासचा खर्च आणि खाण्यापिण्याचा खर्च कसा भागवायचा? कोणत्याही आयोजकाशी करार करण्यापूर्वी कृपया तुमच्या निर्णयाचा विचार करा - तुमच्या एका कट्टर चाहत्याची प्रामाणिक विनंती."

मध्यमवर्गीय कुटुंबांना या पासच्या किमती परवडतील की नाही, याची चिंता आहे. कारण गरब्याचा पारंपरिक प्रेक्षकवर्ग हाच आहे. अनेकांच्या मते, नवरात्री आणि गरबा हा सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणणारा सण आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरसारख्या महागड्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांमुळे हा सण फक्त श्रीमंतांपुरता मर्यादित राहण्याचा धोका आहे.

View post on Instagram

जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर: उत्सवाच्या अनुभवात बदल?

तिकिटांच्या दरांपलीकडे, कार्यक्रमाच्या जागेवरूनही चाहते चिंतेत आहेत. ११ ते १९ ऑक्टोबर दरम्यान होणारा हा उत्सव मुंबईतील भव्य अशा जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. हे सेंटर त्याच्या सुविधा आणि भव्यतेसाठी ओळखले जाते. पण गरब्यासारख्या पारंपरिक उत्सवासाठी हे ठिकाण निवडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे कार्यक्रमाचा मूळ अनुभव आणि त्याचा पारंपरिक बाज हरवेल की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.