Dr. Nilesh Sabale Entry On Star Pravah : ‘चला हवा येऊ द्या’ फेम निलेश साबळे आता स्टार प्रवाहवरील ‘शिट्टी वाजली रे’ मध्ये दिसणार आहेत. झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’चा नवा पर्व सुरू होत असताना निलेशची अनुपस्थिती प्रेक्षकांना खटकणार आहे.

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने दहा वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मात्र, काही काळाच्या विश्रांतीनंतर हा शो 26 जुलैपासून पुन्हा झी मराठीवर सुरू होत आहे. या नव्या पर्वात मात्र एक गोष्ट प्रेक्षकांना खटकणार आहे. आणि ती म्हणजे कार्यक्रमाचा आत्मा ठरलेला सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे याची अनुपस्थिती! मात्र, त्याचवेळी निलेशने चाहत्यांसाठी एक सुखद धक्का दिला आहे. तो झी मराठीवर नाही, तर थेट स्टार प्रवाहवर झळकणार आहे!

स्टार प्रवाहवरील ‘शिट्टी वाजली रे’ मध्ये निलेश साबळेची एंट्री

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय खाद्य महोत्सवाचा खास महाअंतिम सोहळा ‘शिट्टी वाजली रे’ पुढील आठवड्यात रंगणार आहे. याच विशेष भागात डॉ. निलेश साबळे एक खास अतिथी म्हणून मंचावर एन्ट्री करताना दिसणार आहे. त्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये नेहमीच्या खास शैलीत मंचावर येत निलेश म्हणतो, "नमस्कार, सुस्वागतम! मी डॉ. निलेश साबळे, तुम्हा सर्वांचं मन:पूर्वक स्वागत करतो... महाराष्ट्राच्या नंबर वन महाखाद्य महोत्सवात! ज्याचं नाव आहे - शिट्टी वाजली रे!"

View post on Instagram

‘चला हवा येऊ द्या’चा आवाज आता दुसऱ्या मंचावर!

डॉ. निलेश साबळेने अनेक वर्षं ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून हेच शब्द बोलून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. पण यावेळी ही ओळख आता दुसऱ्याच चॅनलवर ऐकायला मिळणं, हे अनेकांसाठी धक्कादायक ठरत आहे. तो ‘शिट्टी वाजली रे’मध्ये पाहुणा कलाकार म्हणून सहभागी होणार असल्याची शक्यता आहे. कारण मुख्य सूत्रसंचालनाची जबाबदारी अद्याप अमेय वाघकडेच आहे. त्याचबरोबर मंचावर सिद्धार्थ जाधवही उपस्थित असल्याने, याची झलक ‘आता होऊ दे धिंगाणा 4’कडे संकेत देणारी वाटते.

‘धिंगाणा 4’चा धमाका लवकरच!

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘आता होऊ दे धिंगाणा 4’ येत्या 9 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्याआधी ‘शिट्टी वाजली रे’चा महाअंतिम भाग हा एक मोठा टीव्ही इव्हेंट ठरणार आहे. या भागातून निलेशची उपस्थिती ही चाहत्यांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.