दिलजीत दोसांझने 'ऑरा इंडिया टूर 2026' मधून वेळ काढून गुजरातच्या गीर नॅशनल पार्कला भेट दिली. तिथे त्याने वन्यजीव सफारी करत आशियाई सिंहांचे दर्शन घेतले. इन्स्टाग्रामवर त्याने या सफारीचे खास क्षण शेअर केले आहेत.

दिलजीत दोसांझची गीर नॅशनल पार्कमध्ये वन्यजीव सफारी

दिलजीत दोसांझने आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून गुजरातच्या गीर नॅशनल पार्कमध्ये वन्यजीव सफारीचा आनंद लुटला. निसर्गाच्या सानिध्यात या लोकप्रिय गायक आणि अभिनेत्याला जंगल सफारी आणि वन्यजीव जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्याने इन्स्टाग्रामवर आपल्या जंगल सफारीचे खास क्षण शेअर केले आहेत. या फोटो आणि व्हिडिओंमध्ये दिलजीत सफारी गियर, कॅमूफ्लाज आऊटफिट आणि ब्राऊन युटिलिटी व्हेस्टमध्ये दिसत असून, तो दुर्बिणीतून निसर्ग न्याहाळताना पाहायला मिळतो.

जंगलाचं सौंदर्य पाहताना त्याची उत्सुकता आणि आनंद स्पष्ट दिसत होता. सफारीदरम्यानचा आणखी एक खास क्षण म्हणजे, एका व्हिडिओत एक सिंहिण जंगलातील वाटेवरून चालताना दिसत आहे आणि दिलजीत आपल्या सफारी वाहनातून हे दृश्य पाहत आहे. दिलजीतने 'GIR National Park Safari Gujarat..AURA INDIA TOUR 2026' असे कॅप्शन देत हा अनुभव शेअर केला आहे.

भारतातील वन्यजीवांमध्ये गीर नॅशनल पार्कचं विशेष महत्त्व आहे. आशियाई सिंहांचं हे नैसर्गिक घर म्हणून जगभरात ओळखलं जातं. येथील समृद्ध जैवविविधता अनुभवण्यासाठी देशभरातून आणि जगभरातून पर्यटक इथे येतात.

याआधी, इंदूरमधील 'ऑरा इंडिया टूर' कॉन्सर्टदरम्यान, दारू आणि शस्त्रांचा उल्लेख असलेल्या चार गाण्यांवर स्थानिक प्रशासनाने निर्बंध लादले होते. या निर्बंधानंतर दिलजीतने दिवंगत कवी राहत इंदोरी यांच्या गझलच्या काही ओळी वाचून दाखवल्या होत्या. मुलांवर चुकीचा प्रभाव पडू नये म्हणून प्रशासनाने हे निर्बंध घातले होते. 15 नोव्हेंबर (रविवार) रोजी झालेल्या या शोमध्ये, दिलजीतने प्रेक्षकांशी बोलताना आपल्या प्लेलिस्टवरील निर्बंधांकडे लक्ष वेधलं. त्याने इन्स्टाग्रामवर या कॉन्सर्टचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो राहत इंदोरी यांच्या ओळी म्हणताना दिसत आहे.

निर्बंधांवर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, “ये नहीं गाना, वो नहीं गाना, ये नहीं कर सकते, वो नहीं कर सकते.” त्यानंतर त्याने राहत इंदोरी यांच्या गझलमधील ओळी वाचल्या, “हमारे मुंह से जो निकले वही सदाकत है, हमारे मुंह में तुम्हारी जुबान थोड़ी है; अगर खिलाफ हैं तो होने दो, जान थोड़ी है; सभी का खून है शामिल यहां की मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है.”

चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटीजने 'पटियाला पेग', '5 तारा', 'केस' आणि 'जट्ट उठे फायर करदा' या चार गाण्यांवर आक्षेप घेतल्यावर हे निर्बंध लादण्यात आले होते. लहान मुलांवर याचा वाईट परिणाम होऊ नये म्हणून आयोजकांना ही गाणी लाइव्ह शोमध्ये न गाण्यास सांगण्यात आले होते. दरम्यान, दिलजीतच्या इंदूर कॉन्सर्टपूर्वी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाला त्यांच्या अधिकृत ईमेलवर धमकीचा मेल आला होता. यानंतर कोर्टाच्या आवारात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. 30 ऑक्टोबरला, दिलजीतने नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये गर्दीने खचाखच भरलेल्या शोने आपल्या 'ऑरा टूर'च्या भारतीय टप्प्याला सुरुवात केली होती. 'G.O.A.T.', 'Ikk Kudi', 'Lalkara', 'Ishq Di Baajiyaan', 'Naina', 'Kinni Kinni', 'Case', 'Panjtaara', 'Hass Hass' आणि 'Water' यांसारख्या सुपरहिट गाण्यांनी त्याने चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं. पण जेव्हा त्याने 'सांसो की माला' सादर केलं, तेव्हा प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद अप्रतिम होता.