मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच महिनाभरात शहरात साखळी बॉम्बस्फोट करण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे. मात्र हा ईमेल फेक असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

नवी दिल्ली: बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा बंगला आणि मुंबईच्या महापौरांच्या कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास हा धमकीचा ईमेल आला. खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा असलेल्या या ईमेलमध्ये ही धमकी देण्यात आली होती. त्यानंतर पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाने कसून तपासणी केली, पण तिथे काहीही संशयास्पद आढळलं नाही.

नेमकं काय झालं?

मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्स आणि मेट्रो स्टेशन्सवरही बॉम्बस्फोट करणार असल्याचं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे, गेल्या एका महिन्यात बच्चन यांच्या बंगल्याला धमकी मिळण्याची ही चौथी वेळ आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यासारखीच महिनाभरात शहरात साखळी स्फोटांची मालिका घडवू, असंही या मेसेजमध्ये म्हटलं आहे. पण, ही निव्वळ अफवा असावी आणि कुणीतरी खोडसाळपणा केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.