Ananya Panday and Walker Blanco : अभिनेत्री अनन्या पांडे आणि वॉकर ब्लँको यांचं जवळपास दोन वर्षांच्या डेटिंगनंतर ब्रेकअप झाल्याची बातमी आहे. या दोघांनी आपलं नातं कधीच अधिकृतपणे स्वीकारलं नव्हतं, पण त्यांच्या भेटीगाठी आणि सोशल मीडिया पोस्टमुळे ते नेहमीच चर्चेत असायचे.
मुंबई : अनन्या पांडे आणि वॉकर ब्लँको यांचं नातं जवळपास दोन वर्षांनंतर तुटल्याचं म्हटलं जात आहे. या दोघांनी कधीही आपल्या नात्याबद्दल उघडपणे काही सांगितलं नसलं तरी, ते अनेकदा एकत्र दिसायचे. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे त्यांच्यात काहीतरी शिजत असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला होता.
अनन्या पांडे आणि वॉकर ब्लँको झाले वेगळे?
ETimes च्या एका ताज्या रिपोर्टनुसार, अनन्याने गेल्या आठवड्यात हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनीही परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्यात कोणताही वाद नाही.
अनन्या आणि वॉकर यांची भेट अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या कार्यक्रमांदरम्यान झाली होती. गेल्या दोन वर्षांत ते अनेकदा एकत्र फिरताना दिसले. एकमेकांच्या इन्स्टाग्राम पोस्टवरही ते दिसायचे, ज्यामुळे त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याची खात्री चाहत्यांना पटली होती.
वॉकरने अनन्याच्या वाढदिवसाच्या खास सेलिब्रेशनलाही हजेरी लावली होती. त्याने अनन्यासाठी एक खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत लिहिलं होतं, “वाढदिवसाच्या शुभेच्छा, ब्यूटीफुल. तू खूप स्पेशल आहेस. आय लव्ह यू, ॲनी!” या पोस्टनंतर तर त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाल्यासारखंच होतं.
बर्थडे पोस्टपासून ते स्पेशल नेकलेसपर्यंत
त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना आणखी खतपाणी मिळालं, जेव्हा अनन्या एकदा वॉकरच्या नावाचं इनिशिअल असलेलं नेकलेस घालून दिसली होती. दोघांनीही नात्याला कोणतंही नाव दिलं नसलं तरी, या घटनांमुळे त्यांच्यातील खास नात्याबद्दलच्या चर्चांना उधाण आलं होतं.
आता जवळपास दोन वर्षांनंतर त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली आहे. चाहते त्यांच्या सोशल मीडियावरील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते.
प्रेमाबद्दल काय म्हणाली होती अनन्या पांडे?
अनन्याने यापूर्वी प्रेमाबद्दलच्या तिच्या बदललेल्या विचारांवर भाष्य केलं होतं. तिच्यासाठी प्रेम म्हणजे मैत्री, विश्वास आणि एकमेकांसोबत सहजपणे वावरता येणं आहे, असं ती म्हणाली होती.
तिने हेही सांगितलं होतं की, पूर्वी तिचा 'एकच सोलमेट' असतो यावर विश्वास होता, पण जसजसं वय वाढलं तसा तिचा दृष्टिकोन बदलला. आता तिला तिच्या मित्र-मैत्रिणी, कुटुंब आणि आजूबाजूच्या लोकांसोबतच्या नात्यांमध्येही प्रेम दिसतं, असं अनन्या म्हणाली होती. अद्याप अनन्या किंवा वॉकर या दोघांपैकी कोणीही त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीला दुजोरा दिलेला नाही.


