बॉलिवूडमध्ये कितीही नवीन स्टार्स आले तरी अमिताभ बच्चन यांची क्रेझ आजही कायम आहे. सोशल मीडियावरील नव्या आकडेवारीतून हेच समोर आलंय. बिग बी आणि किंग खान यांच्या फॉलोअर्समध्ये किती अंतर आहे? जाणून घ्या.
मुंबई : बॉलिवूडचे 'शहेनशहा' अमिताभ बच्चन यांची वयाच्या ८३ व्या वर्षीही चाहत्यांमधील क्रेझ अजिबात कमी झालेली नाही. फक्त चित्रपटांमध्येच नाही, तर सोशल मीडियावरही बिग बींचाच जलवा आहे. एका नव्या रिपोर्टनुसार, सोशल मीडिया फॉलोअर्सच्या बाबतीत अमिताभ बच्चन यांनी शाहरुख खानला अगदी थोड्या फरकाने मागे टाकलं आहे.
'M3M हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२५' मध्ये भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीसोबतच त्यांच्या डिजिटल प्रभावाचीही माहिती देण्यात आली आहे. या यादीत अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि हृतिक रोशन हे सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले प्रमुख सेलिब्रिटी ठरले आहेत. X (ट्विटर), इन्स्टाग्राम आणि लिंक्डइन या प्लॅटफॉर्म्सचा विचार केला, तर अमिताभ बच्चन यांचे तब्बल ४.८७ कोटी फॉलोअर्स आहेत. तर शाहरुख खानचे ४.८६ कोटी फॉलोअर्स आहेत. म्हणजेच या दोघांमध्ये फक्त एक लाखाचं अंतर आहे!
या शर्यतीत हृतिक रोशनही फार मागे नाही. रिपोर्टनुसार, या तीन प्लॅटफॉर्म्सवर त्याचे एकूण ४.८१ कोटी फॉलोअर्स आहेत. बॉलिवूडचा आणखी एक लोकप्रिय चेहरा म्हणजे दिग्दर्शक करण जोहर, जो १.८२ कोटी फॉलोअर्ससह या यादीत झळकला आहे.
पण सोशल मीडिया फॉलोअर्स आणि संपत्ती या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत, हे हुरुनच्या २०२६ च्या यादीतील आकडेवारीवरून स्पष्ट होतं. 'M3M हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२६' च्या स्क्रीन आणि स्पोर्ट्स विभागात शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाची अंदाजित संपत्ती १०,००० कोटी रुपये इतकी आहे. तर अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती ४,००० कोटी रुपये असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय. याशिवाय सलमान खान ३,००० कोटी रुपये आणि हृतिक रोशन २,५०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह या यादीत आहेत.
शाहरुख खान फक्त अभिनयापुरता मर्यादित नाही. चित्रपट निर्मिती, व्हीएफएक्स (VFX) आणि स्पोर्ट्स क्षेत्रातील व्यवसायांमधूनही त्याने आपली ओळख निर्माण केली आहे. दुसरीकडे, अमिताभ बच्चन हे चित्रपट, टीव्ही शोज आणि ब्रँड एंडोर्समेंटसोबतच विविध गुंतवणूक आणि व्यावसायिक कामांमध्ये सक्रिय आहेत.
त्यामुळे आजच्या काळात कितीही नवीन स्टार्स आले, तरी दशकांपूर्वी सिनेसृष्टीत पाऊल ठेवणाऱ्या अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता आजही कशी टिकून आहे, हे या सोशल मीडियाच्या आकडेवारीवरून दिसून येतं. बिग बी आणि किंग खान यांच्यातील फक्त एक लाख फॉलोअर्सच्या अंतराने या बातमीकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


