ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी २० एप्रिल २०२६ रोजी त्यांच्या लग्नाचा १९ वा वाढदिवस साजरा केला. या दोघांची लव्हस्टोरी करिश्मा कपूर आणि सलमान खान यांच्याशी जोडलेली आहे. २००२ मध्ये करिश्माचा अभिषेकसोबत साखरपुडा झाला होता, तर ऐश्वर्या एकेकाळी सलमान खानला डेट करत होती.

मुंबई : करिश्मा कपूर आणि सलमान खान यांच्या एक्स पार्टनर्सनी एकमेकांशीच लग्न केलंय. करिश्मा कपूर आणि सलमान खान यांच्या जुन्या नात्यांबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण या दोघांच्या एक्स पार्टनर्सनी म्हणजेच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी पुढे जाऊन एकमेकांसोबत संसार थाटला. आपापल्या जुन्या नात्यांमधून बाहेर पडल्यानंतर या दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता.

बॉलिवूडमधल्या या सर्वात लोकप्रिय जोडीच्या लग्नाआधी अनेक मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. जुने साखरपुडे मोडण्यापासून ते ब्रेकअपपर्यंत अनेक गोष्टींचा यात समावेश आहे.

करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चनचा साखरपुडा

करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याची एकेकाळी बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा होती. तब्बल पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, २००२ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त या दोघांचा साखरपुडा झाला होता.

पण, अवघ्या काही महिन्यांतच म्हणजे २००३ च्या सुरुवातीला हा साखरपुडा मोडला. दोन्ही कुटुंबांनी यामागचं नेमकं कारण कधीच सांगितलं नाही. पण, कौटुंबिक वाद आणि करिअरच्या चिंतेमुळे हे नातं तुटल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं गेलं.

सलमान खान आणि ऐश्वर्या रायचं जुनं नातं

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअरने ९० च्या दशकाच्या शेवटी आणि २००० च्या सुरुवातीला सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. १९९९ मध्ये 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात प्रेम फुललं होतं.

त्यांचं हे नातं खूप गाजलं, पण २००१-२००२ च्या सुमारास त्यांच्यात दुरावा आला. अखेर सप्टेंबर २००२ मध्ये ऐश्वर्याने स्वतः या ब्रेकअपची जाहीर कबुली दिली. त्यांच्या नात्यात अनेक वाद आणि अडचणी असल्याचं त्यावेळी समोर आलं होतं.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनची लव्हस्टोरी आणि लग्न

ऐश्वर्या आणि अभिषेक पहिल्यांदा एका सिनेमाच्या सेटवरच भेटले होते. २००० मध्ये 'ढाई अक्षर प्रेम के' या चित्रपटाच्या शूटिंगवेळी त्यांची ओळख झाली. इथूनच त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे २००३ मध्ये 'कुछ ना कहो' चित्रपटात त्यांनी पुन्हा एकत्र काम केलं. पडद्यावरची त्यांची केमिस्ट्री खऱ्या आयुष्यातही त्यांच्यातली मैत्री घट्ट करत होती.

२००६ सालापर्यंत त्यांच्या या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊ लागलं होतं. जे.पी. दत्ता यांच्या 'उमराव जान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांनी एकमेकांसोबत खूप वेळ घालवला. याच काळात अभिषेक ऐश्वर्याच्या प्रेमात पडला. त्यानंतर 'धूम २' आणि मणिरत्नम यांच्या 'गुरू' चित्रपटाच्या सलग शूटिंगमुळे ते आणखी जवळ आले. जानेवारी २००७ मध्ये न्यूयॉर्कमध्ये 'गुरू' चित्रपटाचा प्रीमियर झाला. तिथेच अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केलं. विशेष म्हणजे, प्रपोज करण्यासाठी अभिषेकने 'गुरू'च्या सेटवरचीच एक खोटी अंगठी वापरली होती. १४ जानेवारी २००७ रोजी या दोघांनी अधिकृतपणे साखरपुड्याची घोषणा केली आणि बॉलिवूडमधल्या दोन मोठ्या कुटुंबांची सोयरिक जुळली.

साखरपुड्यानंतर काही महिन्यांतच, २० एप्रिल २००७ रोजी ऐश्वर्या आणि अभिषेक विवाहबंधनात अडकले. मुंबईतल्या जुहू येथील बच्चन कुटुंबाचा बंगला 'प्रतीक्षा'मध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडला. हा सोहळा अत्यंत खाजगी असला तरी मीडियामध्ये त्याची प्रचंड चर्चा झाली. याला 'वेडिंग ऑफ द डिकेड' असंही म्हटलं गेलं. २०११ मध्ये त्यांच्या आयुष्यात मुलगी आराध्याची एन्ट्री झाली. तेव्हापासून आराध्याही नेहमीच लाइमलाइटमध्ये असते. ऐश्वर्या आणि अभिषेक आजही बॉलिवूडमधली एक आदर्श जोडी मानली जाते.