26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी ताज्या करणाऱ्या 6 चित्रपट आणि वेबसीरिजची यादी. यामध्ये 'हॉटेल मुंबई', 'मेजर', 'फँटम' आणि 'मुंबई डायरीज 26/11' सारख्या कलाकृतींचा समावेश आहे, ज्यातून त्यावेळचा थरार, शौर्य आणि बलिदान पाहायला मिळतं.

मुंबई : 26/11 चा मुंबई दहशतवादी हल्ला हा भारताच्या इतिहासातील एक काळा आणि कधीही न विसरता येणारा अध्याय आहे. या हल्ल्यात अनेक निष्पाप जीवांचा बळी गेला, पण त्याचवेळी अनेकांनी दाखवलेलं शौर्यही आपण पाहिलं. या घटनेवर आधारित अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिका बनल्या आहेत, ज्यातून शौर्य, जगण्याची धडपड आणि बलिदानाच्या कथा पाहायला मिळतात.

मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यावर आधारित काही चित्रपट खालीलप्रमाणे आहेत.

1. अ‍ॅटॅक्स ऑफ 26/11 (2013)

हा 26/11 च्या मुंबई हल्ल्यावर आधारित एक बायोपिक चित्रपट आहे. यात नाना पाटेकर यांनी राकेश मारिया यांची भूमिका साकारली आहे. ते अजमल कसाब आणि या हल्ल्याचा तपास कसा करतात, हे यात दाखवलंय. मुंबई हल्ल्यातील अनेक सत्य घटनांवर हा चित्रपट प्रकाश टाकतो. हा सिनेमा एअरटेल एक्सस्ट्रीम, प्राईम व्हिडीओ, एमएक्स प्लेयर आणि इरोसवर पाहता येईल. तसंच अ‍ॅपल टीव्हीवरून तो रेंटवर किंवा विकतही घेता येईल.

YouTube video player

2. हॉटेल मुंबई (2018)

देव पटेल आणि अनुपम खेर यांची मुख्य भूमिका असलेला हा एक इंडो-इंटरनॅशनल चित्रपट आहे. ताज हॉटेलवर झालेल्या हल्ल्यावर तो आधारित आहे. दहशतीच्या त्या वातावरणात हॉटेलचे कर्मचारी अतिरेक्यांशी कसे लढतात आणि अनेकांचे प्राण कसे वाचवतात, हे यात पाहायला मिळतं. भारतात हा चित्रपट झी फाईव्ह (ZEE5) वर उपलब्ध आहे. तर आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी तो अ‍ॅपल टीव्ही आणि अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रेंटवर उपलब्ध आहे.

YouTube video player

3. मेजर (2022)

'मेजर' हा मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावरील बायोपिक आहे. लहानपणापासून ते भारतीय सैन्यात दाखल होईपर्यंतचा त्यांचा शौर्याचा प्रवास यात दाखवलाय. अदिवी शेष याने त्यांची भूमिका साकारली असून, मुंबई हल्ल्यादरम्यान इतरांचे प्राण वाचवताना त्यांना वीरमरण कसं आलं, याचं चित्रण यात करण्यात आलं आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

YouTube video player

4. सूर्यवंशी (2021)

'सूर्यवंशी' हा एक फिक्शनल (काल्पनिक) चित्रपट आहे, ज्यात अक्षय कुमार एका अँटी-टेररिझम अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. 26/11 सारखा आणखी एखादा हल्ला मुंबईत होण्याची शक्यता आहे का, याचा तपास तो करताना दिसतो. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यासाठी उपलब्ध आहे.

YouTube video player

5. फँटम (2015)

'फँटम' हा सैफ अली खान आणि कतरिना कैफ स्टारर काल्पनिक सिनेमा आहे. मुंबईवरील हल्ल्यामागील मास्टरमाईंड्सचा खात्मा करण्यासाठी राबवलेल्या गुप्त मोहिमेवर यात भाष्य करण्यात आलंय. हा चित्रपट नेटफ्लिक्स, प्राईम आणि जिओहॉटस्टारवर उपलब्ध आहे.

YouTube video player

6. मुंबई डायरीज 26/11 (2021)

'मुंबई डायरीज 26/11' ही एक मेडिकल वेबसीरिज आहे. विविध रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसची गोष्ट यात आहे. अशा भयानक दहशतवादी हल्ल्यात रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी कशी शर्थीची झुंज देतात, हे यात दाखवलंय. या सीरिजचे दोन सीझन असून दोन्ही प्राईम व्हिडीओवर उपलब्ध आहेत.

YouTube video player