बीड जिल्हा कारागृहात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींनी एका कैद्याला जागेच्या वादातून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर एका कथित ऑडिओ क्लिपमुळे जेल प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.

बीड जिल्हा कारागृहातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून वाल्मिक कराड गँगची दहशत अजूनही कायम असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तुरुंगात असतानाही काही आरोपींचा दबदबा कमी झाला नसल्याचे या घटनेतून दिसून येत आहे. या प्रकरणामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

आरोपींनी केली मारहाण 

माहितीनुसार, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि इतर साथीदारांनी एका कैद्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. अझर अब्दुल रहमान पठाण असे या कैद्याचे नाव असून, त्याच्यावर तुरुंगातच हल्ला झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे इतर कैद्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भांडण का झालं? 

ही मारहाण किरकोळ कारणावरून झाल्याची माहिती आहे. बॅरिकमध्ये बसण्याच्या जागेवरून झालेला वाद अचानक हिंसक वळणावर गेला आणि त्यातून संबंधित कैद्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर तुरुंगात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या प्रकरणाला वेगळं वळण देणारी एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या क्लिपमध्ये मारहाण झालेल्या कैद्याने गंभीर आरोप केले असून, “माझ्यावर हल्ला झाला, माझं ऐकून घेतलं जात नाही,” असा दावा त्याने केल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, जेल प्रशासनावरही संगनमताचे आरोप करण्यात आले आहेत.

ऑडिओ क्लिपमध्ये आणखी धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. संबंधित कैद्याने जेलरनेही धमक्या दिल्याचा आरोप केला असून, तक्रार केली तरी काहीही कारवाई होत नसल्याचे सांगितले आहे. यामुळे संपूर्ण प्रकरण अधिकच गंभीर बनले असून, कारागृह प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, दुसरीकडे कारागृह प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कैद्यांमध्ये फक्त शाब्दिक वाद झाला होता आणि कोणतीही तक्रार नसल्याचे संबंधित कैद्याने लेखी दिले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.