सोलापूरमधील एका उच्चभ्रू वसाहतीमधील एक तरुणी आणि एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पण या दोघांनी आत्महत्या का केली याबद्दलचे कारण अद्याप सांगण्यात आलेले नाही.

Solapur Crime : सोलापूर शहरातील उच्चभ्रू वसाहतीतील कर्णिक नगर परिसरात गुरुवारी सायंकाळी हृदयद्रावक घटना घडली. २३ वर्षीय युवती आणि २१ वर्षीय तरुणाने एका बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, आत्महत्या करण्याआधी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत 'आम्ही भाऊ-बहीण आहोत' असा उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दोघांचे मृतदेह एकाच दोरीला लटकलेले आढळले

मृत तरुणाचे नाव रोहित भिमु ठणकेदार (वय 21, रा. मड्डी वस्ती, सोलापूर) आणि युवतीचे नाव अश्विनी विरेश केसापुरे (वय 23, रा. शाहीर वस्ती, सोलापूर) असे आहे. या दोघांचे मृतदेह कर्णिक नगर येथील एका बंगल्यातील दुसऱ्या मजल्यावर एकाच दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अधिक तपास सुरू आहे.

चिठ्ठीत 'भाऊ-बहीण' नात्याचा उल्लेख

घटनास्थळी पोलिसांना एक चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये आम्ही भाऊ-बहीण आहोत, असा उल्लेख आहे. मात्र खरोखरच दोघांचे नाते तसे होते की आणखी काही व्यक्तिगत कारण होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.

अश्विनी शिक्षणासाठी कर्नाटकात होती

अश्विनी केसापुरे ही युवती सोलापुरात शिक्षण पूर्ण करून कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील डी.फार्मसी कॉलेजमध्ये पुढील शिक्षण घेत होती. सध्या ती सोलापुरात सुट्टीसाठी आली होती. गुरुवारी सकाळी ती कॉलेजसाठी निघाली होती, मात्र सायंकाळी तिच्या आत्महत्येची माहिती एमआयडीसी पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना दिली. रुग्णालयात तिच्या मृतदेहाचे दर्शन होताच तिच्या आई-वडिलांनी हंबरडा फोडला.

रोहित ट्रक चालक म्हणून काम करत होता

मृत रोहित ठणकेदार हा तरुण अविवाहित असून तो ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. तो काही महिन्यांपासून अश्विनीच्या संपर्कात होता. अश्विनीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, तो तिला भेटण्यासाठी काही वेळा त्यांच्या घरी आला होता. नातेवाईकांनी त्यांच्यातील नात्याविषयी विचारणा केली असता त्यांनी एकमेकांना "भाऊ-बहीण" म्हणत स्पष्ट केले होते.

पोलिसांचा तपास सुरू

या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, पोलीस याचा सखोल तपास करत आहेत. मृतदेहांचे शवविच्छेदन शासकीय रुग्णालयात करण्यात येत असून त्यानंतर दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत. ही आत्महत्या की आणखी काही कारण, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

राज्यातील कपलने आत्महत्या केल्याची प्रकरणे- 

  • नागपूरमध्ये वाढदिवशी कपलने उचललं टोकाचं पाऊल नागपूरमधील मार्टीनगर परिसरात लग्नाच्या वाढदिवशीच जोडीने आत्महत्या केली. आत्महत्येपुर्वी त्यांनी व्हॉट्सॲपवर व्हिडिओ पोस्ट केला आणि नंतर फंदावर गळफास घेतला होता. 
  • वारुळवाडी परिसरातील नारायणगावजवळ एका नवविवाहित जोडप्याने डिंभा कालव्यात उडी मारून आत्महत्या केली. पत्नी पल्लवी (25) आणि पती चिराग शेळके (28) यांचे मृतदेह आढळले होते. 
  • संगमनेरमध्ये गेल्या वर्षी, आधी मुलाने आत्महत्या केली, त्यानंतर गणेश वाडेकर आणि गौरी वाडेकर या पालकांनी आठ दिवसांतच एकाच वेळी आत्महत्या केली. घटनास्थळी दोन सुसाइड नोट्स आढळल्या होत्या.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.