सार

लखनौतील वृंदावन योजनेतील एका सोसायटीमध्ये दहाव्या मजल्यावरून पडून ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या वडिलांनी पतीवर पैशांसाठी त्रास देत हत्या केल्याचा आरोप केला आहे.

लखनौ: दहाव्या मजल्यावरून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेत तिच्या पतीवर आरोप करण्यात आले आहेत. निवृत्त अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश असलेल्या महिलेच्या वडिलांनी ही तक्रार दाखल केली आहे. पैशांची मागणी करून जावयाने आपल्या मुलीला त्रास दिला आणि तिची हत्या केली, असा आरोप वडिलांनी केला आहे.

ही घटना लखनौतील वृंदावन योजना येथील आरवली एन्क्लेव सोसायटीमध्ये घडली. ४० वर्षीय प्रीती द्विवेदी ही दहाव्या मजल्यावरून पडून मृत्युमुखी पडली. प्रीती तिचा पती रवींद्र द्विवेदी आणि दोन मुलांसह येथे चौथ्या मजल्यावर राहत होती. फ्लॅटच्या कर्जाचे पैसे देण्यासाठी रवींद्र द्विवेदी सतत त्रास देत होता, असा आरोप प्रीतीचे वडील शारदा प्रसाद तिवारी यांनी तक्रारीत केला आहे. रवींद्र द्विवेदीने आपल्या मुलीला दहाव्या मजल्यावरून ढकलून तिची हत्या केली, असाही त्यांनी आरोप केला आहे. लग्न झाल्यापासून जावई पैशांची मागणी करून मुलीला त्रास देत होता, असे निवृत्त न्यायाधीशांनी सांगितले.

"मी दरमहा जावयाला १०,००० रुपये पाठवत असे. तरीसुद्धा तो धमक्या देऊ लागला म्हणून मी पैसे पाठवणे बंद केले", असे शारदा प्रसाद तिवारी म्हणाले. या घटनेचा तपास सुरू करण्यात आल्याचे लखनौ पोलिसांनी सांगितले. इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज आणि घटनास्थळावरून मिळालेले इतर पुरावे तपासले जात आहेत. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.