सार
खोट्या कॉलबाबत लोकांनी सावधगिरी बाळगावी, असे सरकारने सूचित केले आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) च्या फॅक्ट चेक टीमने एक्सवर पोस्ट करून हे कॉल खोटे असल्याचे म्हटले आहे.
आर्थिक फसवणुकीचे प्रकार दररोज नव्या स्वरूपात समोर येत आहेत. खात्यातील पैसे बुडण्यापासून वाचण्यासाठी सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. आता सरकारने एका नव्या फसवणुकीबाबत इशारा दिला आहे. तुमचे क्रेडिट कार्ड फसवणुकीमुळे तुमचे बँक खाते ब्लॉक केले जाईल, असा इशारा देत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नावाने फोन कॉल किंवा व्हॉइसमेल येऊ शकतो. असा कॉल आल्यास घाबरू नका, असा इशारा देण्यात आला आहे.
अशा खोट्या कॉलबाबत लोकांनी सावधगिरी बाळगावी, असे सरकारने सूचित केले आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) च्या फॅक्ट चेक टीमने एक्सवर पोस्ट करून हे कॉल खोटे असल्याचे म्हटले आहे.
फसवणुकीचा प्रकार असा
तुमचे क्रेडिट कार्ड फसवणुकीच्या कारवायांमध्ये सामील आहे आणि पुढील दोन तासांत तुमच्या नावावरील सर्व बँक खात्यांवर बंदी घातली जाईल, अशा प्रकारे फोन कॉल येतो. अधिक माहितीसाठी नऊ दाबा असे सांगितले जाते. असा कॉल आल्यास कोणतेही नंबर दाबू नका किंवा कॉलरशी संवाद साधू नका. त्याऐवजी, तो नंबर त्वरित ब्लॉक करा.
आरबीआय किंवा कोणतीही कायदेशीर बँक कधीही कॉल किंवा ईमेलद्वारे वैयक्तिक माहिती मागत नाही. शंका असल्यास, तुमच्या बँकेशी त्यांच्या अधिकृत हेल्पलाइनद्वारे थेट संपर्क साधा. अशा घटना घडल्यास सायबर गुन्हे पोर्टलवर किंवा तुमच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवा.