सार

Sassoon Hospital: दोन्ही पाय नसलेल्या व्यक्तीला अज्ञात स्थळी फेकताना डॉक्टरांना स्टिंग ऑपरेशन करून रंगेहाथ पकडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Sassoon Hospital: ससून रुग्णालयातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली असून ससूनचे डॉक्टर बेवारस रुग्णांना अज्ञात स्थळी फेकून देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन करत हा धक्कादायक प्रकार समोर आणला आहे. ससूनचे डॉ. आदी आणि त्यांचे सहकारी या प्रकरणात असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधित डॉक्टरवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. डॉ. आदी कुमार (ज्युनियर रेसिडेंट, ऑर्थो विभाग) असे या निर्दयी डॉक्टराचे नाव आहे.

या घटनेसंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी डॉ. आदी आणि त्यांच्या सहकाऱ्याला निलंबित केले आहे. तसेच त्यांच्यावर येरवडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार धंगेकरांनी सुद्धा मंगळवारी सकाळी पवार यांची भेट घेतली. संबंधित डॉक्टरांना निलंबन करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. निलंबन झाले नाही तर उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता.

ससूनमध्ये याआधीही रुग्णांच्या जीवाशी खेळ झाले असून अक्षरश काहींना तर जीव गमवावा लागला आहे. अनेक प्रकरणे तर दाबली गेली आहेत. आताच्या ललित पाटील आणि पोर्शे अपघात प्रकरणानंतर ससूनवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच अशी माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली. या प्रकरणाशी संबंधित असणारे डॉक्टर, कर्मचारी तो रिक्षावाला यांच्यावर कारवाई होणार का? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. अशातच ससून रुग्णालय प्रशासनाने त्या डॉक्टरांचे निलंबन केले आहे.

हा प्रकार डॉक्टरांमधील असंवेदनशीलता दाखवणारा : आमदार धंगेकर

डॉक्टर बेवारस रुग्णांना निर्जनस्थळी सोडून देतात. काही दिवसांनी हेच डॉक्टर रुग्णांच्या शरीराचे अवयव विक्री करण्यास देखील मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळे अशा डॉक्टरांचे तातडीने निलंबन झाले पाहिजे. त्यांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे असे प्रकार पुन्हा होणार नाहीत. खासगी रुग्णालयातील दर परवडत नाहीत म्हणून अनेक रुग्ण सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येतात. पण सरकारी रुग्णालयात होणारी पिळवणूक, मिळणारी अपमानास्पद वागणूक वाढत चालली आहे. त्यातूनच हा निर्जनस्थळी सोडून देण्याचा प्रकार घडला आहे, जो डॉक्टरांमधील असंवेदनशीलता दाखवणारा असल्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले आहे.

आणखी वाचा :

Baramati Accident : बारामतीत पालखी महामार्गावर टायर फुटल्याने कारचा अपघात, १ ठार