फरार बिल्डर विशाल अग्रवालच्या पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून मुसक्या आवळल्या

| Published : May 21 2024, 08:47 PM IST

porsche car accident case

सार

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोघांना चिरडले होते. यामध्ये अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता.

 

पुणे: कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या वेदांत अग्रवाल याचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्यावर गु्न्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर विशाल अग्रवाल फरार झाले होते. यानंतर पुणे पोलिसांनी त्यांच्या तपासासाठी अनेक पथकं तयार केली होती. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटे छत्रपती संभाजीनगरमधून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतले. विशाल अग्रवाल यांना आता दुपारपर्यंत पुण्यात आणण्यात येईल. विशाल अग्रवाल यांच्यावर अटकेची कारवाई केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. यावेळी न्यायालय काय निकाल सुनावणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

विशाल अग्रवाल यांच्यावर नेमका काय गुन्हा?

वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन होता. त्याने पोर्शे कारने दोघांना चिरडल्यानंतर पुण्यात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता. यानंतर पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता. मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर मोटर वाहन अधिनियमाच्या कलम 3, 5 आणि 199 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच आपला अल्पवयीन मुलगा दारू पितो हे ठाऊक असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर बाल न्याय अधिनियमनाच्या कलम 75 आणि 77 अंतर्गत आखणी एक गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे विशाल अग्रवाल यांच्या अडचणी वाढल्या होत्या. यानंतर ते फरार झाले होते.

पब चालकांवर गुन्हा दाखल

या अपघातानंतर पुण्यासह राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. कायदा फक्त नावालाच आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. या गदारोळानंतर पुणे पोलिसांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईला सुरुवात केली होती. वेदांत अग्रवाल हा ज्या हॉटेलमध्ये दारु प्यायला होता, त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाला मद्य देणारे हॉटेल काझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.