सार

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर जखमींना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असलेल्या यवतजवळ एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जात असलेली बस झाडावर आदळल्याने अपघात झाला आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावर यवत जवळ झालेल्या या अपघातात जवळपास 30 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. अपघात झालेली ही बस पंढरपूरहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र पुणे जिल्ह्यातील यवतजवळ असलेल्या सहजपूर गावाच्या हद्दीत या बसला अपघात झाला‌. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले होते.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर जखमींना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र झाडावर आदळेल्या बसची फोटो पाहिल्यानंतर अपघाताची तीव्रता लक्षात येते. या अपघातात बसचा चेंदामेंदा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असे ब्रीद घेऊन महामंडळाची बस रस्त्यावर धावते. परिवहान महामंडळाच्या बसला नागरिकही लाल परी आपली हक्काची म्हणून पसंती देतात. मात्र, गेल्या काही दिवसांत बस अपघातातही वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेकदा, या बस अपघातांना बसची दूरवस्था कारणीभूत असल्याचेही दिसून येते. पावसाळ्यात चक्क बसच्या टपांमधून पाणी गळत असल्याचे व्हिडिओही समोर आले आहेत. त्यामुळे, रस्त्यावर धावणाऱ्या बसची आणि बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा यानिमित्ताने पुढे आला आहे.

आणखी वाचा :

पुणे-नाशिक महामार्गावर दुचाकी-कारचा भीषण अपघात, आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले; एकाचा मृत्यू