सार

रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांना बाळ जगेल अशी आशा नव्हती. दोन महिन्यांच्या उपचारानंतर बाळ पूर्णपणे बरे झाले.

लखनौ: पालकांनी पुलावरून फेकलेल्या सात दिवसांच्या बाळाला चमत्कारिकरित्या जीवदान मिळाले. झाडाला अडकल्यामुळे बाळाचे प्राण वाचले. बाळाच्या शरीरावर पन्नासपेक्षा जास्त जखमा होत्या. दोन महिन्यांच्या उपचारानंतर बाळ पूर्णपणे बरे झाले आहे असे डॉक्टरांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथे सात दिवसांच्या बाळाला २६ ऑगस्ट रोजी झाडाला अडकलेल्या अवस्थेत आढळले. बाळाच्या पाठीवर प्राण्यांच्या चाव्यांसह पन्नासपेक्षा जास्त जखमा होत्या. कानपूरमधील लाला लजपत राय रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांना बाळ जगेल अशी आशा नव्हती. हमीरपूरच्या जिल्हा रुग्णालयाने बाळाला लाला लजपत राय रुग्णालयात रेफर केले होते. जन्माष्टमीच्या दिवशी सापडल्यामुळे बाळाचे नाव कृष्ण असे ठेवण्यात आले.

बाळाला हमीरपूरजवळील रठी येथील पुलावरून पालकांनी फेकले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सुदैवाने, तो एका मोठ्या झाडाला अडकल्यामुळे त्याचे प्राण वाचले, असे डॉ. संजय काला म्हणाले. बाळ वेदनेने रडत असताना परिचारिका दूरून त्याला गाणी म्हणत होत्या. त्याच्या शरीरावर असंख्य जखमा असल्यामुळे त्याला उचलणेही शक्य नव्हते. बाळ वेदनेने रडत असताना आपल्याही डोळ्यात पाणी येत असे, असे डॉक्टर आणि परिचारिका म्हणाल्या. दोन महिन्यांच्या उपचारानंतर २४ ऑक्टोबर रोजी बाळाला पोलिस आणि बालकल्याण समितीच्या सदस्यांकडे सोपवण्यात आले. तोपर्यंत सर्वजण बाळाशी इतके जोडले गेले होते की त्यांना बाळाला सोडून जाताना दुःख झाले.

पालकांना बाळाला पुलावरून कसे फेकता आले, असा प्रश्न डॉक्टर विचारतात. जर त्यांना बाळ नको असेल तर ते रुग्णालय, मंदिर किंवा चर्चसमोर सोडू शकले असते, असे डॉक्टर म्हणाले. बाळाचे भविष्य उज्ज्वल असो, अशी प्रतिक्रिया बाळाची काळजी घेणाऱ्या परिचारिका लक्ष्मी यांनी दिली. बाळाला फेकणाऱ्या पालकांची ओळख आणि त्यामागचे कारण पोलिसांनी अद्याप उघड केलेले नाही.