सार

नाशिकमध्ये 10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खासगी क्लासमधील शिक्षकाने मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीने आईला आपबिती सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

नाशिक: बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी ठिकठिकाणी आंदोलन होत असतानाच नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. 10 वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. खासगी क्लासमधील शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला असून पोलिसांनी शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. नाशिकच्या उपेंद्रनगर परिसरात ही घटना घडली आहे.

उपेंद्रनगरमधील एका खासगी ट्युशन सेंटरमधील धक्कादायक प्रकार आला समोर

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या सिडको परिसरात 10 वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग झाला आहे. खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकानेच विनयभंग केला आहे. इयत्ता पाचवीमध्ये शिकणारी मुलगी क्लासरूममध्ये एकटी होती. तेव्हा संबंधित शिक्षकाने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याची माहिती मिळत आहे. उपेंद्रनगरमधील एका खासगी ट्युशन सेंटरमधून हा प्रकार उघडकीस आला आहे.

पीडितेने आईला सांगितली संपूर्ण आपबिती

या प्रकारानंतर पीडित मुलगी क्लासवरून घरी आली. मात्र दुसऱ्या दिवशी तिने क्लासला जाण्यास नकार दिला. यानंतर पीडितेच्या आईने तिला विश्वासात घेत तिच्याशी संवाद साधला असता पीडित मुलीने आईला संपूर्ण आपबिती सांगितली आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

अंबड पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

यानंतर कुटुंबीयांनी तातडीने अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकांच्या तक्रारीनंतर संशयित शिक्षकाला अंबड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये संतापाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.

आणखी वाचा : 

बदलापूर अत्याचार: मुलींवर 15 दिवसांपासून अत्याचार, समितीचा धक्कादायक निष्कर्ष