Women's U19 T20 Trophy: क्रिकेटच्या मैदानात कुत्रे, साप किंवा पक्षी येणं नवीन नाही. पण नागपूरमध्ये महिलांच्या अंडर-१९ टी-२० ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत जे घडलं, ते तुम्ही कधीच पाहिलं नसेल. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Women's U19 T20 Trophy Quarter-Final: बाउंड्री लाईनजवळ ती फिल्डिंग करत होती. तिचं लक्ष खेळावर होतं. पण अचानक १५ वर्षांची क्रिकेटर उमा काशवी (Uma Kashvi) मोठ्या संकटात सापडली. बाउंड्री लाईनजवळ एक माकड बसलं होतं. ते अचानक उमाच्या अंगावर धावून आलं. या अनपेक्षित हल्ल्यामुळे उमा चांगलीच घाबरली आणि थेट मैदानावर पडली. सुदैवाने माकडाने तिला कोणताही चावा घेतला नाही किंवा ओरबाडलं नाही. ते दुसऱ्या बाजूला निघून गेलं. या प्रकारामुळे मॅच काही काळ थांबवावी लागली. पण थोड्या वेळातच खेळ पुन्हा सुरू झाला. त्यानंतर मॅचमध्ये कोणताही अडथळा आला नाही. माकड उमाच्या अंगावर धावून गेल्याचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
उमाची दमदार कामगिरी
नागपूरमध्ये (Nagpur) महिलांच्या अंडर-१९ टी-२० ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये (Women's U19 T20 Trophy Quarter-Final) कर्नाटक आणि विदर्भ (Karnataka vs Vidarbha) यांच्यात मॅच सुरू होती. माकडाने घाबरवूनही उमाने या मॅचमध्ये जबरदस्त खेळ दाखवला. या १५ वर्षांच्या खेळाडूने ४ ओव्हरमध्ये फक्त १८ रन देऊन ३ विकेट्स घेतल्या. उमाच्या या भेदक बॉलिंगमुळे कर्नाटकने विदर्भाचा ६ रन्सनी पराभव केला आणि सेमी-फायनलमध्ये धडक मारली. या मॅचमध्ये कर्नाटकने पहिल्यांदा बॅटिंग करताना २० ओव्हरमध्ये ७ विकेट्स गमावून १४० रन्स केले होते. एक वेळ अशी होती की त्यांनी ६५ रन्सवर ५ विकेट्स गमावल्या होत्या. पण तिथून खुशी सूर्यकांत आणि इंचारा उमेश यांनी सहाव्या विकेटसाठी ३८ रन्सची महत्त्वाची पार्टनरशिप केली आणि डाव सावरला. खुशी सूर्यकांत ३३ रन्सवर नॉट आऊट राहिली, तर कर्णिका कार्तिकने २३ रन्स केले. या टार्गेटचा पाठलाग करताना विदर्भाची सुरुवात चांगली झाली, पण त्यांनी ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. स्वरा ठाकरे (नॉट आऊट ३२) आणि साक्षी भूपाल (नॉट आऊट २५) यांनी शेवटपर्यंत झुंज दिली. पण २० ओव्हरमध्ये विदर्भाला ७ विकेट्सवर १३४ रन्सच करता आले. त्यामुळे कर्नाटकने ही मॅच ६ रन्सनी जिंकली. आता शनिवारी नागपूरच्या लेडी अमृतबाई डागा कॉलेज ग्राऊंडवर कर्नाटकची सेमी-फायनलमध्ये बडोद्याशी लढत होईल. याच मैदानावर दुसरी सेमी-फायनल दिल्ली आणि हरियाणा यांच्यात खेळवली जाईल.
WPL ऑक्शनमध्ये उमाची एन्ट्री
अवघ्या १५ वर्षांच्या उमाने २०२७ च्या विमेन्स प्रीमियर लीग (Women's Premier League 2027 Auction) ऑक्शनसाठी आपलं नाव नोंदवलं आहे. तिची बेस प्राईस १० लाख रुपये आहे. आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करून फ्रँचायझींचं लक्ष वेधून घेण्याचं तिचं ध्येय आहे.
