सार
मध्यप्रदेशमध्ये बलात्काराच्या आरोपातून माजी नगरसेवक शफीक अन्सारी यांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांचे घर पाडण्यात आले होते, आता ते निर्दोष असल्याचे सिद्ध झाले असले तरी त्यांच्याकडे घर राहिले नाही.
भोपाळ: मध्यप्रदेशमध्ये बलात्कार प्रकरणातून माजी नगरसेवकाला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. पुरेसे पुरावे नसल्याने त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले. शफीक अन्सारी यांना सोडण्यात आले आहे. त्यांच्यावर तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांचे घर पाडण्यात आले होते. शफीक अन्सारी आता निर्दोष असल्याचे सिद्ध झाले असले तरी त्यांच्याकडे घर नाही. ही घटना २०२१ मधील आहे. त्यांच्यावर शेजारच्या महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर १० दिवसांच्या आत प्रशासनाने त्यांचे घर पाडले.
“मी कष्ट करून ४,००० चौरस फूट जागेवर घर बांधले होते. आता तिथे फक्त ढिगाराच उरला आहे. आम्ही माझ्या भावाच्या घरी राहत आहोत,” असे ५८ वर्षीय अन्सारी म्हणाले. “ आमच्याकडे सर्व कागदपत्रे होती. परवानगीशिवाय घर बांधल्याचा आरोप होता. पण आम्हाला कागदपत्रे दाखवण्याची किंवा काहीही बोलण्याची संधी दिली नाही. माझे सात जणांचे कुटुंब आहे. सगळेच त्रासले आहेत. मी तीन महिने तुरुंगात होतो,” असेही ते म्हणाले. सारंगपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक होते, असे अन्सारी म्हणाले.
४ मार्च २०२१ रोजी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, मुलाच्या लग्नासाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन अन्सारीने ४ फेब्रुवारी २०२१ रोजी तिला घरी बोलावून बलात्कार केला. तथापि, राजगड जिल्ह्यातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश चित्रेंद्र सिंग सोलंकी यांनी तक्रारदार आणि तिच्या पतीच्या साक्षीत विसंगती आढळल्या. घराजवळ पोलीस चौकी असतानाही त्यांनी ताबडतोब तक्रार दाखल केली नाही, असे न्यायालयाने नमूद केले. मुलाचे लग्न झाल्यानंतर १५ दिवसांपर्यंत त्यांनी पतीला किंवा कोणालाही या घटनेची माहिती दिली नाही. या विलंबाचे कोणतेही कारण दिलेले नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. तक्रारदार महिलांच्या नमुन्यात मानवी वीर्य आढळले नाही. क्लिनिकल आणि वैज्ञानिक पुराव्यांनुसार बलात्कार झाल्याचे सिद्ध करता आले नाही, असे आदेशात म्हटले आहे.