झारखंडच्या बोकारोमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी सकाळी एका तीन वर्षांच्या चिमुकल्याने मामाकडे चॉकलेट मागितले, पण मामाने त्याच्या हातात चक्क पिस्तूल दिले. या पिस्तुलातून चुकून गोळी झाडली गेल्याने या निष्पाप मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

झारखंडच्या बोकारो जिल्ह्यात शनिवारी सकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एका तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या हातात त्याच्या सख्ख्या मामाने खेळायला पिस्तूल दिलं. या पिस्तुलातून अचानक गोळी सुटली आणि त्यात या निष्पाप मुलाचा जीव गेला. घटनेनंतर मामा पिस्तूल घेऊन फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

माराफारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कर्नल मार्केट परिसरात शनिवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.

माराफारी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संजय कुमार यांनी या घटनेची माहिती दिली. ते म्हणाले, "मामाने दिलेल्या पिस्तुलासोबत खेळत असताना अचानक गोळी झाडली गेली आणि ती थेट मुलाला लागली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या चिमुकल्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिथे पोहोचण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं."

राजेश कुमार (वय २१) असं या आरोपी मामाचं नाव आहे. तो सध्या हत्यारासह फरार आहे. मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची पथकं वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारत आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

मुलाच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचा भाऊ शनिवारी सकाळीच त्यांच्या घरी आला होता. त्यावेळी या लहानग्याने मामाकडे चॉकलेटचा हट्ट धरला. पण मामाने चॉकलेट देण्याऐवजी चक्क एक पिस्तूल त्याच्या हातात टेकवलं. हे पिस्तूल घेऊन खेळत असतानाच अचानक त्यातून गोळी सुटली आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला, असा दावा आईने केला आहे.

सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.