सार
प्रथम जन्म प्रमाणपत्रासारखी कागदपत्रे तयार करून नंतर त्यांच्या आधारे इतर कागदपत्रे तयार करून शेवटी त्यांच्या साहाय्याने पासपोर्ट मिळवण्याची ही पद्धत होती.
नवी दिल्ली: विदेशी नागरिकांना बनावट भारतीय पासपोर्ट पुरवणाऱ्या रॅकेटचा दिल्ली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. विविध देशांतील ४२ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील १३ जण बांगलादेशी नागरिक असल्याचे दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.
अटक करण्यात आलेल्यांपैकी २३ जण एजंट म्हणून काम करत होते. इतर प्रवासी होते. बेकायदेशीरपणे भारतीय सीमा ओलांडून शेजारील देशांमधून आल्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करून भारतीय पासपोर्ट मिळवण्याची ही त्यांची पद्धत होती, असे दिल्ली पोलिस उपायुक्त उषा रंगनानी यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या १३ बांगलादेशी नागरिकांव्यतिरिक्त, म्यानमारमधील चार, नेपाळमधील तीन आणि एक अफगाण नागरिकालाही अटक करण्यात आली आहे. बेकायदेशीरपणे परदेश प्रवास करण्यासाठी हे सर्वजण बनावट भारतीय पासपोर्ट मिळवत असल्याचे पोलिसांना आढळून आले.
अटक करण्यात आलेल्या एजंटपैकी नऊ जण बंगालमधील, चार दिल्लीतील, तीन महाराष्ट्रातील आणि उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, ओडिशा, राजस्थान येथील प्रत्येकी एक असे आहेत. विदेशी नागरिकांसाठी ते प्रथम भारतातील जन्म प्रमाणपत्रासारखी कागदपत्रे तयार करत. नंतर त्यांच्या आधारे इतर कागदपत्रे मिळवत. ही सर्व कागदपत्रे सादर करून पासपोर्ट मिळवत असत.
पश्चिम बंगाल, दिल्ली, महाराष्ट्र येथे हे रॅकेट केंद्रित होते. यापूर्वी यूएईहून आलेल्या एका बांगलादेशी नागरिकाकडून बनावट भारतीय पासपोर्ट सापडला होता. याची चौकशी केल्यानंतर बांगलादेशी नागरिकांना बनावट भारतीय पासपोर्ट पुरवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला.