Delhi Cafe Crime: दिल्लीतील मौजपूर येथील एका कॅफेमध्ये फैझान नावाच्या 24 वर्षीय तरुणावर गोळ्या झाडून त्याचे आयुष्य संपविण्यात आले. या घटनेनंतर, एका संशयिताने व्हायरल व्हिडिओमध्ये गुन्ह्याची कबुली दिली आहे.
Delhi Cafe Crime: भारतात 2023 मध्ये गुन्हेगारीत 7.2 टक्के वाढ होऊन 6.24 दशलक्ष गुन्हे नोंदवले गेले असून दर पाच सेकंदाला एक गुन्हा घडत आहे. या वाढत्या गुन्हेगारीमागे बेरोजगारी, दारिद्र्य, सामाजिक-सांस्कृतिक घटक आणि अप्रभावी फौजदारी न्याय व्यवस्था हे प्रमुख कारण आहेत. महिलांवरील अत्याचार, खून आणि सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतही गुन्हेगारीने कळस गाठला आहे.
ईशान्य दिल्लीतील मौजपूर येथील मिस्टर किंग लाउंज अँड कॅफेमध्ये झालेल्या एका धक्कादायक मृत्यूमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणाशी संबंधित एक थरारक कबुलीजबाबाचा व्हिडिओ ऑनलाइन समोर आल्याने हे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. फैझान उर्फ फज्जी (वय २४) असे मृत तरुणाचे नाव असून, गुरुवारी रात्री उशिरा त्याच्यावर गोळ्या झाडत त्याचे आयुष्य संपविण्यात आले. पोलिसांनी यानंतर, संशयित आणि त्याच्या संभाव्य साथीदारांना पकडण्यासाठी अनेक पथके तैनात केली आहेत.
ही घटना 23 जानेवारी रोजी रात्री 10.28 च्या सुमारास घडली, जेव्हा दिल्ली पोलिसांना कॅफेमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांना फैझान अनेक गोळ्या लागून जखमी अवस्थेत आढळला. त्याला तातडीने गुरु तेग बहादूर (जीटीबी) रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, गोळ्या त्याच्या डोक्यात आणि छातीत लागल्या होत्या, तसेच त्याच्या शरीरावर झटापटीच्या खुणाही आढळल्या आहेत.
हत्येनंतर काही तासांतच, संशयिताच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केलेला एक व्हिडिओ व्हायरल झाला. या क्लिपमध्ये, आरोपीने फैझानच्या मृत्यूची जबाबदारी उघडपणे स्वीकारली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या कथित मारहाणीचा संदर्भ देत तो म्हणाला, "त्याने मला मारले, म्हणून मी त्याला गोळ्या घातल्या." त्याने या प्रकरणी त्याचे वडील, कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा पैशांच्या वादाचा कोणताही संबंध असल्याचे स्पष्टपणे नाकारले आणि हा प्रकार केवळ वैयक्तिक शत्रुत्वातून झाल्याचा दावा केला.
संशयिताच्या या नाट्यमय कबुलीमुळे हत्येमागील हेतू अधिकच गूढ झाला आहे. तथापि, फैझानच्या भावाने वैयक्तिक वादाचा दावा फेटाळून लावला असून, या गोळीबारामागे आर्थिक कारण असल्याचा आरोप केला आहे. त्याने दावा केला की, फैझानने एक कर्ज घेतले होते जे तो फेडू शकला नाही. आरोपी आणि त्याच्या वडिलांनी यापूर्वी त्याला धमकावले होते आणि कथितरित्या घरी येऊन वाद घातला होता. फैझानच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, ह*ये पूर्वी त्यांनी भजनपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, परंतु त्यांच्या तक्रारीकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही असे त्यांना वाटते.
अधिकाऱ्यांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 103(1) अंतर्गत, तसेच अवैध शस्त्र कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पथके कॅफे आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, जेणेकरून घटनेचा क्रम, संशयितांची ओळख आणि गोळीबारापूर्वी आणि नंतरच्या त्यांच्या हालचालींचा माग काढता येईल.
या घटनेमुळे मौजपूर परिसरात धक्का बसला असून, रहिवासी आणि कॅफेमधील ग्राहकांनी गोळीबारानंतर पसरलेल्या दहशतीचे वर्णन केले आहे. फॉरेन्सिक पथकांनी पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळ सील केले आहे, तर स्थानिक पोलीस आरोपी आणि त्याच्या वडिलांचा शोध घेत आहेत, ज्यांचा पूर्वीच्या वादातही सहभाग असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणामुळे तरुणांमधील वाढते हिंसक वाद, अवैध शस्त्रांचा प्रसार आणि वैयक्तिक संघर्षातून होणारे जीवघेणे हल्ले रोखण्यामध्ये पोलिसांसमोर असलेले आव्हान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. तपासकर्त्यांचे म्हणणे आहे की, तपास सुरू असून, नवीन माहिती समोर येताच कुटुंब आणि जनतेला माहिती दिली जाईल.


